Advertisement

बाहेर भाजपावर हल्ला करणारी शिवसेना सभागृहात गप्प का?


बाहेर भाजपावर हल्ला करणारी शिवसेना सभागृहात गप्प का?
SHARES

शिवसेना आणि भाजपा यांच्यातील राजकीय नाट्य अख्या महाराष्ट्राला माहीत आहे. राज्यातील विविध मुद्यांवर नेहमीच टीका करणारे शिवसेनेचे नेते सभागृहात मात्र गप्प होते. हिवाळी अधिवेशन सुरू होऊन दोन दिवस झाले. या दोन्ही दिवशी सभागृहात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांनी हल्लाबोल करत सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले असताना शिवसेनेचे नेते मात्र मूग गिळून गप्प का बसले अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


गोंधळामुळे दुसरा दिवसही फुकट

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेचं कामकाज सकाळी अकरा वाजता सुरू झाल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळजवळ सर्वच सदस्यांनी वेलमध्ये उतरत 'शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार असो', 'फडणवीस सरकार हाय हाय', 'शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे' अशी घोषणाबाजी करू लागले. त्यामुळे विधानसभेचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. त्यानंतर पुन्हा अर्धा तास आणि नंतर पंधरा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले गेले.


तरीही शिवसेना शांतच

या गडबडीत सरकारने दोन विधयके मांडली. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अध्यक्षांच्या दिशेने कागदी विमान सोडले. यावर तालिका सभापती योगेश सागर यांनी आव्हाड यांना सक्त ताकीद दिली. पण शिवसेनेचे सर्व मंत्री आणि आमदार मात्र हा गोंधळ शांतपणे बघत बसले होते.


सभागृहातही गप्पच

दुसरीकडे विधान परिषदेत विधानसभेतील गोंधळाचीच पुनरावृत्ती झाली. विधानपरिषद दोनदा स्थगित करण्यात आली. शिवसेना भाजपाच्या सदस्यांव्यतिरिक्त सर्व सदस्य सभापतींसमोरील वेलमध्ये येऊन घोषणा करत होते. यावेळी संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी काहीप्रमाणात विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण विरोधकांच्या घोषणा सुरूच होत्या. यावेळीही शिवसेनेचे सदस्य विधानसभेप्रमाणे या सभागृहातही गप्पच होते.


सभागृहात गप्प पण पायऱ्यांवर आंदोलन

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही सभागृहात गप्प बसणारे शिवसेनेचे नेते सभागृहाबाहेर मात्र मराठा आरक्षणप्रश्नी काहीसे आक्रमक दिसले. शिवसेनेच्या १०-१२ आमदारांनी सभागृह सुरू होण्याआधी पायऱ्यांवर बसून मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणा दिल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नी मात्र शिवसेनेनं सभागृहात दाखवलेल्या चुप्पीची कुजबुज दोन्ही सभागृह तहकूब झाल्यावर सर्वत्र सुरू होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा