Advertisement

मुंबई भाजपा प्रवक्त्यांना 'बोलती बंद'चे आदेश


मुंबई भाजपा प्रवक्त्यांना 'बोलती बंद'चे आदेश
SHARES

सध्या विविध वृत्त वाहिन्या किंवा वर्तमानपत्रांना प्रतिक्रिया देण्यासाठी सगळ्याच पक्षांकडून प्रवक्ते नेमण्याचा ट्रेण्ड आहे. हे प्रवक्ते वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमात आपल्या पक्षाची बाजू हिरीरीने मांडतात. सद्यस्थितीत भाजपा प्रवक्ते यांत वरचढ असल्याचं दिसत असलं, तरी मुंबई भाजपाने आपल्याच प्रवक्त्यांची 'बोलती बंद' केली आहे.

'बोलती बंद' म्हणजे या प्रवक्त्यांना कुठेही प्रतिक्रिया देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आता तुम्हाला वाटेल की, नांदेड निवडणुकीच्या पराभवानंतर या प्रवक्त्यांना बोलण्यास मनाई केली असेल. पण तसे नसून यापूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा धसका घेऊन यापुढे अधिक घोळ होऊ नये, म्हणून ही काळजी घेण्यात आल्याचे समजते.


का घातली बंदी?

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबई भाजपाच्या प्रवक्त्यांकडून काही वृत्तवाहिन्यांवर केली गेलेली वक्तव्ये, हे या प्रवक्त्यांना बोलण्यास बंदी घालण्याचे मुख्य कारण आहे. आता तुम्ही म्हणाल की एलफिन्स्टन दुर्घटना आणि या प्रवक्त्यांचा नेमका संबंध तरी काय? तर झाले असे की एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर भाजपाला विरोधकांनी चांगलेच झोडले होते. त्यातच विविध वाहिन्यांवर या दुर्घटनेनंतर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाजपाच्या मुंबई प्रवक्त्यांनाही विविध वाहिन्यांवर चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र यातल्या भाजपाच्या काही प्रवक्त्यांच्या वक्तव्यामुळे आशिष शेलार आणि विशेषत: मुंबई भाजपा चांगलेच अडचणीत आले होते. 

यामुळे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि केशव उपाध्ये यांच्या सहीचे पत्रच या प्रवक्त्यांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबई भाजपा प्रवक्त्यांची चांगलीच गोची झाली आहे. त्यातच आता नांदेडमधील पराभवाच्या चर्चेला पुन्हा अशी चूक कुणाकडून होऊ नये म्हणून या प्रवक्त्यांना गप्प राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.


कोण आहेत हे प्रवक्ते?

  • संजू वर्मा ( मुख्य प्रवक्त्या)
  • निरंजन शेट्टी
  • संजय सिंह ठाकूर
  • योगेश वर्मा
  • अॅड. आरती साठे
  • अॅड. राहुल तिवारी


याबाबत 'मुंबई लाइव्ह'ने मुख्य प्रवक्त्या संजू वर्मा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतची सविस्तर प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार हेच देतील, असे सांगून फोन ठेवला.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा