श्रद्धा जाधव यांच्याविरोधात सर्व पक्षीय उमेदवारांची तक्रार

 Parel
श्रद्धा जाधव यांच्याविरोधात सर्व पक्षीय उमेदवारांची तक्रार
Parel, Mumbai  -  

काळाचौकी - मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी घोटाळा केला असल्याची तक्रार पराभूत उमेदवार करीत आहेत. महापालिका एफ दक्षिण विभागातील प्रभाग क्रमांक 202 मध्येही विजयी उमेदवार श्रद्धा जाधव यांनी अशाच प्रकारचा घोटाळा केला असल्याची लेखी तक्रार सोमवारी दाखल करण्यात आलीय. या प्रभागातील सर्व पराभूत उमेदवारांनी शिवडी क्रॉस रोड येथील रफी अहमद किडवाई पोलीस ठाणे, परळ पूर्व येथील महापालिका एफ दक्षिण विभाग आणि काळाचौकी येथील साईबाबा पथ निवडणूक अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली आहे. वॉर्ड क्रमांक 202 मध्ये श्रद्धा जाधव यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या रिया बावकर, मनसेच्या प्रणाली बामणे, भाजपाच्या विजयालक्ष्मी पवार आणि काँग्रेसच्या उमा भास्करन उभ्या होत्या. या सर्व पराभूत उमेदवारांनी एकत्र येत विजयी उमेदवार श्रद्धा जाधव यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

"प्रभाग क्रमांक 202 च्या उमेदवार श्रद्धा जाधव यांनी अनेक वेळा नियमांचा भंग केला आणि ईव्हीएम मशीनमध्ये देखील गडबड केली. मतदान यंत्रणेत बिघाड करून केवळ एकाच उमेदवाराला मतदान मिळेल अशा पद्धतीने त्यांनी निवडणूक आयोगाच्या संगनमताने हे कार्य केले," असा आरोप सर्व पक्षीय पराभूत उमेदवार करीत आहेत.

"प्रभाग क्रमांक 202 मधील जनता श्रद्धा जाधव यांच्या विरोधात आहे. मग निवडणुकीत 12 हजार 32 मतांनी त्यांना विजय कसा मिळाला?" असा प्रश्न पराभूत उमेदवारांनी उपस्थित केला आहे. "मतदानाच्या दिवशी शिवडी पश्चिम येथील बारादेवी म्युनिसिपल शाळेत मतदान संपल्यानंतर साधारण पावणे सहा वाजता श्रद्धा जाधव यांनी अनधिकृतरित्या मतदान केंद्रावर प्रवेश केला. या मतदान केंद्रावर 30 ते 38 क्रमांकाचे असे 9 बूथ आहेत. तेथील यंत्रणेत त्यांनी घोटाळा केला असल्याने त्या विजयी झाल्या आहेत. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अन्यथा सर्वपक्षीय आंदोलन करू," असा इशाराही पराभूत उमेदवारांनी दिला आहे.

Loading Comments