Advertisement

दुकानदारी कुणाची?


दुकानदारी कुणाची?
SHARES

दुकानदारी हा शब्द सध्याच्या जमान्यात शिवीसारखा झालाय आणि मुख्यमंत्र्यांनी तर सरसकट मीडियालाच शिवी हासडली. परंतु, ही दुकानदारी केवळ मीडियातच आहे का, राजकारणात नाही?

मुख्यमंत्रीसाहेबांनी भाजपाच्या कार्यकारिणीत मीडियाच्या दुकानदारीचा उल्लेख करून एकजात सर्व मीडियावाल्यांना एकाच माळेत आणून बसवलं. तरी बरं, मुख्यमंत्रीसाहेब जेव्हा देवेनभाऊ होते तेव्हा याच मीडियातील अनेकांनी त्यांना एक चांगला आमदार, धडपड्या नेता म्हणून बिनशर्त पाठिंबा देण्याचं काम केलं होतं. चॅनेलवरची चर्चा असो किंवा विधानसभेतलं त्यांचं भाषण असो, विरोधी पक्षनेत्यापेक्षा कधीकधी जास्त फूटेज देवेनभाऊ खाऊन जायचे. तेव्हा नाही कधी मीडियातली दुकानदारी जाणवली, याचेच आज आश्चर्य वाटले.


टीआरपीचे गणित

तसंतर, विरोधी पक्षनेते हे मीडियाचे सर्वात लाडके व्यक्तिमत्त्व असते. कारण, मीडियाच्या ट्रेनिंगमध्येच अँटी गव्हर्नमेंट स्टँड घेण्याचे बाळकडू पाजले जाते. तरीही सरकारची चांगली कामे जनतेसमोर आणण्याचे कामही मीडिया करत असते. परंतु, टीआरपी, वाचकसंख्या वाढवण्यासाठी तसेच सरकारी यंत्रणेला ताळ्यावर आणण्यासाठी गौप्यस्फोट, स्टिंग ऑपरेशन, धक्कादायक बातम्याच अधिक गरजेच्या असतात. याला अजूनतरी पर्याय सापडलेला नाही.

जनतेच्या प्रश्नांशी संबंधित बातम्यांना प्राधान्य हवे, हे कितीही मान्य असले तरी प्रत्यक्षात गॉसिप, नेत्यांचे घोटाळे आदी बातम्यांचा प्रतिसाद पाहा. मीडियाला तुम्हीच इंडस्ट्री बनवली आणि स्पर्धा निर्माण केली. त्यामुळे, स्पर्धेपायी प्रत्येकजण आपले वेगळेपण सिद्ध करण्यासाठी धडपडू लागला. त्यातच, पेड पत्रकारिता नावाची पीत पत्रकारिता वाढली असली तरी सरसकट मीडिया भ्रष्ट आहे, असं म्हणण्याचं धाडस कुणीच करणार नाही. परंतु, मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने मीडियावर आगपाखड केली ते पाहता देवेनभाऊंचं काहीतरी बिनसलंय असंच वाटलं.


मीडियाफ्रेंडली की मीडियासॅव्ही?

मीडियाफ्रेंडली आणि मीडियासॅव्ही अशा दोन प्रकारच्या नेत्यांची सध्या चलती असते. दुर्दैवाने सध्याच्या विरोधी पक्षांमध्ये अशा नेत्यांची बऱ्यापैकी कमतरता आहे. त्यातही सॅव्ही बरेच आहेत पण, मीडियाफ्रेंडली तसे नावालाच आहेत. त्याला एक कारण म्हणजे बराच काळ सत्तेत असल्याने मीडियाकडून फैलावर घेतले जाण्याचा अनुभव असल्याने मीडियापासून दोन हात राखायची सवय यातल्या अनेकांना आजही आहे. कमकुवत विरोधकांमुळे सत्ताधाऱ्यांचे फावत असले तरी कुणाच्याच दुकानदाऱ्या जास्त काळ चालत नाही, हेही लक्षात घ्यायला हवे.

शरद पवार, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांच्यासारख्या नेत्यांबरोबर मीडियाचे एक वेगळेच नाते राहिले आहे. अभ्यासाशिवाय या नेत्यांना प्रश्न विचारणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे होते. त्यामुळे मीडियात या नेत्यांच्या प्रेसला ज्येष्ठ किंवा अभ्यासू पत्रकारांनाच पाठवण्याची प्रथा होती. विशेषतः वृत्तवाहिन्या आल्यानंतर तर हा फरक प्रकर्षाने जाणवू लागला होता आणि बऱ्याचदा मीडियावालेही एकमेकांना यावरूनच टोचत असत.

देवेनभाऊंची सॉरी मुख्यमंत्रीसाहेबांची इमेजही तशी अभ्यासूच आहे. त्यामुळे, खरंतर त्यांनी प्रत्येक प्रश्नांचे अभ्यासपूर्ण उत्तर देऊन गप्प करण्याची सवय पुढे नेली पाहिजे. परंतु, त्यांचा महाजन, पवार अथवा ठाकरेंसारखा दरारा नाही, हे मात्र खरे. त्यामुळेच असेल कदाचित, मीडिया त्यांना थेट प्रश्न विचारण्याचे धाडस करते किंवा त्यांच्याबद्दल लिहिते.


सहनशक्ती वाढवा!

पवारांपासून ठाकरेंपर्यंत सर्वांविषयी मीडियाने सातत्याने विरोधी लिखाण केलंच आहे. परंतु, त्यांच्याकडूनही इतक्या वर्षांत सरसकट मीडियाला दुकानदार बनवण्याचा उद्योग झाला नव्हता तो मुख्यमंत्रीसाहेबांनी अवघ्या तीन वर्षांत केला. यावरूनच तुमचे पेशन्स (राजकीय सहनशक्ती) दिसतात.

असो, अजूनही तुमच्याबद्दल आदर असल्याने सांगावेसे वाटते की सरसकट सर्वच राजकारणी जसे वाईट नसतात तसेच सरसकट मीडियाही दुकानदार नसते, हे लक्षात घ्या! तुम्ही तुमचे शब्द मागे घेऊन निराशेचे मळभ झटका आणि नव्या उमेदीने कामाला लागा. मीडियातले तुमचे हितचिंतक चांगल्या कामांना नक्कीच प्रसिद्धी देत राहतील. परंतु, `तुका म्हणे निंदकाचे घर असावे शेजारी` या उक्तीनुसार त्यांनाच तुमचा आरसाही बनू द्या. कारण, अनधिकृतरीत्या थाटलेल्या दुकानांची दुकानदारी फार काळ चालत नाहीच!




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा