पान मसाला, गुटखा बंदीची ऐशी-तैशी, मुंबई लाइव्हने केला पर्दाफाश


SHARES

विमल पान मसाला देना..10 वाला नही है?..दे दे 4 पंधरावाले...हा संवाद तुम्हाला कुठल्यातरी गल्लीबोळातल्या नाक्यावरचा वाटेल. पण तो कुठला आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कदाचित धक्का बसेल. हा संवाद आहे महाराष्ट्राच्या सत्तेचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालय परिसरातला. आणि नुसताच परिसरातला नाही तर मंत्रालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर हा पान-मसाला आणि गुटखा विक्रीचा गोरख धंदा चालतो. 'मुंबई लाइव्ह'च्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा गोरखधंदा कैद झालाय.

हा प्रकार समजताच 'मुंबई लाइव्ह'नं पुढाकार घेऊन या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश केलाय. राज्यभरात जी गुटखा-पानमसाला बंदी लागू आहे, ती जणू काही मंत्रालय परिसराला लागूच नाही की काय? अशाच पद्धतीने बिनबोभाटपणे इथे गुटखा आणि पानमसाल्याची विक्री केली जात आहे. या व्हिडिओमध्ये सदर पानविक्रेता कायद्याची, पोलिसांची किंवा आपण मंत्रालय आवारातच बसलो आहोत याची कोणतीही भीती न ठेवता बिनधास्तपणे हा गोरखधंदा करतोय. आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे याच्या गिऱ्हाईकांमध्ये सामान्य माणसांप्रमाणेच चक्क पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळे नक्की गुन्हा होतोय कसा? आणि त्याची दाद मागायची तरी कुणाकडे? असाच प्रश्न 'मुंबई लाइव्ह'नं केलेलं हे स्टिंग ऑपरेशन पाहून तुम्हाला पडेल.

दिवसाढवळ्या मंत्रालय परिसरातच चालणारा हा गोरखधंदा. राज्याची सत्ता ज्या ठिकाणावरून चालवली जाते त्याच ठिकाणी गुटखा, पान मसाला विक्री सर्रासपणे सुरू आहे. मग राज्यातील चांद्यापासून बांद्यापर्यंतची काय परिस्थिती असेल, त्याचा अंदाजच लावलेला बरा.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पंधरा दिवसांमध्ये एकट्या मुंबईमध्ये तब्बल 35 लाखांचा गुटखा अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पकडला आहे. गुटख्यावर जेव्हा बंदी नव्हती, तेव्हा तर महाराष्ट्रात एका महिन्यात 300 कोटींच्या गुटख्याचे सेवन केले जात होते. गुटखा, पान मसाला बंदी करणारे महाराष्ट्र हे देशातील तिसरे राज्य आहे. एका बाजूला जनतेचे आरोग्य महत्त्वाचे असल्यामुळे गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी घातली आहे, तर दुसऱ्या बाजूला याच गुटखा, पान मसाल्याची सर्रासपणे विक्री होत आहे. त्यामुळे राज्य सरकारची यंत्रणा या प्रकाराविषयी किती गंभीर आहे अशी शंका मात्र उपस्थित होत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा