Advertisement

दमानिया खोडसाळ बातम्या पसरवित आहेत - छगन भुजबळ


दमानिया खोडसाळ बातम्या पसरवित आहेत - छगन भुजबळ
SHARES

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना आर्थर रोड जेलमध्ये पंचतारांकित सुविधा मिळत असल्याचा आरोप मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. त्याला प्रत्त्युत्तर देत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आर्थर रोडमधून प्रसिद्धी पत्रक काढले आहे. या दोन पानी पत्रामध्ये त्यांनी ''आपल्याला रुग्णालयामध्ये उपचार मिळू नये म्हणून माझ्या विरोधात अंजली दमानिया खोट्या, खोडसाळ बातम्या पसरवित आहेत. अशा प्रकारचे काम करण्याचे कंत्राटच दमानिया यांनी उचलले आहे, माझी बदनामी करण्यासाठी तसेच न्याय व्यवस्थेवर परिणाम करण्यासाठी त्या खोटे आरोप करत आहेत. त्यामुळे वकिलांचा सल्ला घेऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करणार आहे'', असा दावा केला आहे.

या पत्रात छगन भुजबळ यांनी दावा केला आहे की, घरच्या जेवणाबाबत न्यायालयाने मला परवानगी दिली आहे. त्यामुळे दोन तासांनी फळे दिली जातात, हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. तुरुंगाच्या कॅटिंनमध्ये काही फळे ठेवली जातात. ती फळे आमच्या ठराविक खर्चातून आम्ही घेऊ शकतो.

प्रत्येक सर्कलमध्ये एक सामुदायिक टीव्ही तुरुंगात लावण्यात आला आहे. या टीव्हीवर फक्त दूरदर्शन चॅनल लावले जाते, असा दावाही भुजबळ यांनी केला आहे.

दमानिया यांनी आरोप केला आहे की, समीर भुजबळ यांना नारळ पाण्यातून व्होडका पुरविली जाते. त्यावर उत्तर देताना भुजबळ लिहितात की, ऑर्थर रोड जेलमध्ये सर्व ठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत आणि जेलमध्ये यावर निरीक्षणही ठेवले जाते. त्यामुळे जेलमध्ये मोबाइलवर बोलणे किंवा व्होडका मिळणे हा आरोपही पूर्णपणे खोटा आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई स्वतः या आरोपांची चौकशी करणार आहेत. दमानिया यांनी केलेल्या आरोपावर चौकशी सुरु झाल्यानंतर छगन भुजबळांना पंचताराकित सुविधा मिळत आहे की नाही हे स्पष्ट होईल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा