Advertisement

भाजप नेते आशिष शेलारांची महापौरांवर टीका; राज्य महिला आयोगानं मागवला अहवाल

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यानं भाजपाचे नेते आशिष शेलार अडचणीत आले आहेत.

भाजप नेते आशिष शेलारांची महापौरांवर टीका; राज्य महिला आयोगानं मागवला अहवाल
SHARES

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यानं भाजपाचे नेते आशिष शेलार अडचणीत आले आहेत. मुंबईतील एका दुर्घटनेवरुन आशिष शेलार यांनी महापालिका प्रशासन आणि महापौरांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.

राज्य महिला आयोगानं यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. हा अहवाल आल्यानंतर राज्य महिला आयोगाकडून आशिष शेलार यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. शिवाय, शिवसेनेच्या महिला आघाडीकडूनही आशिष शेलार यांच्याविरुद्ध पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली जाणार आहे. त्यामुळे आशिष शेलार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वरळीच्या बीडीडी चाळीतील दुर्घटनेनंतर आशिष शेलार यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होते. याठिकाणी सिलिंडरचा स्फोट होऊन काहीजण जखमी झाले होते. या घटनेत ४ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला तसेच बाळापाठोपाठ वडिलांचाही मृत्यू झाला. मुंबईच्या महापौर मात्र ७२ तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोहोचल्या. याच मुद्द्यावरुन आशिष शेलार यांनी महापौरांना लक्ष्य केलं होतं.

नायर रुग्णालयात पोहोचलेल्या जखमींना तब्बल ४५ मिनिटे उपचारांविना तसंच ठेवलं गेलं. त्यांच्यावर औषधोपचार नाही की विचारपूस नाही. या बेफिकिरीमुळं ४ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार टाळकं फिरवणारा आहे. त्यामुळं जनतेच्या मनातलाच प्रश्न आम्ही विचारतोय की मुंबई महापालिकेत चाललंय काय? सिलिंडर स्फोटाच्या ७२ तासांनंतर मुंबईच्या महापौर त्याठिकाणी पोहोचतात, एवढे तास कुठे निजला होतात, अशा आशयाचं वक्तव्य शेलार यांनी केले होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा