Advertisement

कॅगच्या रिपोर्टमुळे मोदी सरकारच्या योजनांवर प्रश्नचिन्ह?

काँग्रेस, आपनं याच अहवालाचा आधार घेत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

कॅगच्या रिपोर्टमुळे मोदी सरकारच्या योजनांवर प्रश्नचिन्ह?
SHARES

केंद्रातील मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये घोटाळा झाला आहे. आयुष्यमान भारत योजनेसह सात योजनांमध्ये हा घोटाळा झाल्याचा कॅगचा रिपोर्ट आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यावरून काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सरकारच्या सहा योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यांवर अधिक ताशेरे ओढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं आहे.

आता मोदींनी या विषयावर मौन सोडावं, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. कॅगने चक्क मोदी सरकारचा घोटाळा काढला आहे. आता कॅगवर ईडीच्या धाडी मारल्या पाहिजेत. कॅगची घोटाळा बाहेर काढण्याची हिंमतच कशी झाली? असा उपरोधिक टोला काँग्रेसने लगावला आहे. तर कॅगला देशद्रोही ठरवा, असा चिमटा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काढला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

तर, नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल आला असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

नितीन गडकरींचा काटा काढायचा आहे. हे अंतर्गत राजकारण आहे. कदाचित त्यामागची पार्श्वभूमी असू शकते. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार असताना कॅगने फक्त गडकरींच्या खात्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यावरून सर्व काही स्पष्ट होतं. गडकरींची प्रतिमा स्वच्छ आहे. विकासाची आहे. त्यातून त्यांना साईड ट्रॅक करायचं. त्यांचं राजकारण संपवायचं हा डाव असू शकतो, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

कॅगमध्ये गडकरींच्या खात्यांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. पण पंतप्रधान हे रस्ते समितीचे अध्यक्ष असतात. मग पंतप्रधानांची भूमिक काय हा प्रश्न उपस्थित होतो. केंद्रात मोठा भ्रष्टाचार आहे. आता जे आलं त्यावर केंद्र सरकार काय कारवाई करेल हे पाहणार आहोत, असंही ते म्हणाले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा