Advertisement

भारतबंद: मुंबईत कम्युनिस्ट पक्षाचं उत्स्फूर्त आंदोलन

वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भीम आर्मीकडून करण्यात आलेलं आंदोलन आणि भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे शिवाजी पार्क ते चैत्यभूमी असा काढण्यात आलेला मोर्चा वगळला तर मुंबईत कुठेही बंद झाला नाही वा कोणतंही मोठं आंदोलन झालं नाही.

भारतबंद: मुंबईत कम्युनिस्ट पक्षाचं उत्स्फूर्त आंदोलन
SHARES

अॅट्राॅसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात देशभरातील दलित-आदिवासी संघटनांनी सोमवारी 'भारत बंद'ची हाक दिली होती. देशातील विविध भागात या आंदोलनाचा भडका उडालेला असताना मुंबईत मात्र या बंदचा कोणताही परिणाम दिसला नाही, त्यामुळे सकाळपासूनच मुंबईतील जनजीवन सुरळीत होतं.

वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भीम आर्मीकडून करण्यात आलेलं आंदोलन आणि भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे शिवाजी पार्क ते चैत्यभूमी असा काढण्यात आलेला मोर्चा वगळला तर मुंबईत कुठेही बंद झाला नाही वा कोणतंही मोठं आंदोलन झालं नाही.




दलित संघटनांकडून संताप

अॅट्राॅसिट कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे हा कायदाच धोक्यात आला आहे, कायदा रद्दबातल झाल्यातच जमा असल्याचं म्हणत दलित संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच हा निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी दलित-आदिवासी संघटनांकडून उचलून धरण्यात येत होती. याच मागणीसाठी सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती.



हिंसक वळण

भारत बंद आंदोलन सुरू होण्यास काही तास उरले असताना, १ एप्रिलच्या रात्री उशीरा केंद्राकडून फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ट्विटरवरून देण्यात आली. पण तोपर्यंत उशीर झाल्याचं म्हणत भारत बंदवर ठाम राहत सोमवार सकाळपासूनच देशभरातील विविध राज्यात भारत बंद आंदोलन करण्यात आलं. मात्र त्याला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं आणि ७ जण ठार झाले. दरम्यान दुपारी केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे.


जोरदार घोषणाबाजी

दुपारी ४ वाजता दादर, वीर कोतवाल मैदान येथे कम्युनिस्ट पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अॅट्राॅसिटी कायद्याला आणखी मजबूत करण्याची मागणी उचलून धरली. वीर कोतवाल ते चैत्यभूमी असा मोर्चा काढत आंदोलकांनी आपला निषेध नोंदवला. अॅट्राॅसिटी कायदा मजबूत करण्याविषयी केंद्र सरकारने ठोस पाऊल उचललं नाही तर येत्या काळात यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कम्युनिस्ट पक्षाकडून देण्यात आला.



हेही वाचा-

२५ हजार शेतकरी आणि शांततापूर्ण आंदोलन



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा