Advertisement

पालघर लोकसभा पोटनिवडणूक: भाजपाचे गावित यांचा दणदणीत विजय

भाजपा आणि शिवसेनेनं ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती, तर दुसरीकडं ही निवडणूक ईव्हीएम घोटाळा तसंच राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळं वादग्रस्त ठरली होती. या रणधुमाळीत अखेर भाजपानं कमळ फुलवत आपली प्रतिष्ठा राखली आहे. भाजपाचे आयात उमेदवार राजेंद्र गावित यांनी ४० हजारहून अधिक मतांची आघाडी घेत विजय निश्चत केला आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणूक: भाजपाचे गावित यांचा दणदणीत विजय
SHARES

गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत कमळ फुलणार, धनुष्य बाण चालणार की शिट्टी वाजणार याकडं केवळ राज्याचंच नव्हे; तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. कारण अनेक कारणांनी भाजपा आणि शिवसेनेनं ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती, तर दुसरीकडं ही निवडणूक ईव्हीएम घोटाळा तसंच राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळं वादग्रस्त ठरली होती. या रणधुमाळीत अखेर भाजपानं कमळ फुलवत आपली प्रतिष्ठा राखली आहे. भाजपाचे आयात उमेदवार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी २९ हजार ७७२ हजार मतांनी धूळ चारत दणदणीत विजय मिळवला. तर, बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव तिसऱ्या क्रमांकावर राहिले.


कुणाला किती मतं?

  • राजेंद्र गावित (भाजपा) - २ लाख ७२ हजार 
  • श्रीनिवास वनगा (शिवसेना) - २ लाख ४३ हजार २०६
  • बळीराम जाधव (बविआ) - २ लाख २२ ८३६
  • किरण गेहला (माकप) - ७१ हजार ८७७


पालघर लोकसभा पोटनिवडणूक निकाल Live updates: साठी इथं क्लिक करा




राजकीय नाट्याला 'इथून' सुरूवात

भाजपाचे खासदार चिंतामण वानगा याचं आस्कमिक निधन झाल्यानं पालघर लोकसभेची जागा रिक्त झाली. चिंतामण वानगा यांच्या मृत्यूनंतर भाजपानं वानगा कुटुंबियांकडं दुर्लक्ष केलं. त्यातच वानगा यांचे पुत्र श्रीनिवास वानगा यांना भाजपानं तिकीटही नाकारलं. यानंतर पालघरमध्ये एक वेगळचं राजकीय नाट्य रंगलं. नाराज वानगा कुटुंबियांनी पालघरवरून थेट वांद्रयातील मातोश्री गाठत कमळावर धनुष्यबाण रोखला. अधिकृतपणे सेनेत प्रवेश करत सेनेनं पहिल्यांदाच पालघर लोकसभेत उमेदवार दिला. तर दुसरीकडे काँग्रेसवर प्रचंड नाराज असणारे राजेंद्र गावित भाजपाच्या गळाला लागले नि भाजपानं या आयात उमेदवाराला उमेदवारी दिली.



पाठीत खंजीर खुपसला

श्रीनिवास वानगा यांचा सेनेतला प्रवेश नाही म्हटलं तरी भाजपाच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळंच भाजपाच्या प्रत्येक सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो वा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असो, त्यांनी वानगाच्या मुद्दयावर शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. एकूणच यावरून जे राजकीय नाट्य सुरू झालं त्याचवेळेस पालघरच्या पोटनिवडणुकीचा सामना भाजपा आणि सेनेमध्येच रंगणार हे नक्की झालं. पण त्याचवेळी पालघरमधील वसई, विरार आणि नालासोपारा या पट्ट्यात वर्चस्व असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनंही बळीराम जाधव यांना उमेदवारी देत भाजपा आणि सेनेसाठी पोटनिवडणूक अवघड केली. काँग्रेसनंही दामू शिंगडा यांना उमेदवारी दिली खरी, पण काँग्रेसची लढत ही नावापुरतीच ठरणार हे त्याचवेळी निश्चित झालं आणि झालंही तसंच.



योगी आदित्यनाथ यांची टीका

वानगाप्रकरण जिव्हारी लागलेल्या भाजपानं ही पोटनिवडणुक जिंकण्याचा चंग बांधला आणि त्यामुळंच प्रचाराच्यादरम्यान चांगलाच धुराळा उडवून दिला. मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या नेत्यांनी पालघर जिल्हा पिंजून काढला. कुठं तरी मनात रूखरूख असलेल्या भाजपानं कोणतीही रिस्क नको म्हणत थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही प्रचारासाठी पाचारण केलं. दुसरीकडं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रचारासाठी चांगलाच जोर लावला.


पैसे वाटताना रंगेहात

प्रचारादरम्यान भाजपा आणि सेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यास सुरूवात करत टीकेच्या सर्व मर्यादा पार केल्या. प्रचारादरम्यान सेनेनं भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगेहाथही पकडलं. तर सेनेनं प्रचारादरम्यान थेट मुख्यमंत्र्यांची एक वादग्रस्त आॅडिओ क्लिप जाहीर सभेत एेकवत एकच खळबळ उडवून दिली. क्लिपच्या माध्यमातून साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर करा पण निवडणुका जिंका असं सांगणार्या मुख्यमंत्र्यांना मग सेनेसह सर्वच पक्षांनी कोंडीत पकडलं.


ईव्हीएमचा घोळ

प्रचाराचा धुराळा संपून मतदानाचा दिवस उजाडला तरी पोटनिवडणुकीवरील वादाचं ग्रहण मात्र कायमच होतं. मतदानास सुरूवात झाली नाही तोच ईव्हीएम मशिन बंद पडल्या नि मग ईव्हीएम घोळावरून भाजपा आणि सेनेत शीतयुद्ध रंगलं. साम, दाम, दंड, भेद नीती म्हणजेच ईव्हीएम घोळ अशी टीका सेनेनं केली. तर त्यात भर म्हणून निवडणुक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या मतदानाच्या टक्केवारीच्या आकडेवारीनंतर सेना चांगलीच खवळली. एका रात्रीत ८२ हजार मतं कशी वाढली, असा सवाल करत सेनेचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली.


चिटींग की व्होटींग?

असं हे सगळं नाट्य ज्या पालघर पोटनिवडणुकीसाठी रंगल होतं त्या पोटनिवडणुकीत भाजपानं बाजी मारत प्रतिष्ठा राखली खरी. पण भाजपाच्या या विजयानंतर भाजपावर सेनेसह विरोधकांकडून सडकून टीका होत असून हा विजय चिटींगचा की व्होटींगचा असा सवाल केला जात आहे. तर साम, दाम, दंड, भेद नीती वरचढ ठरली, ईव्हीएम मशीनचा विजय झाला अशा तिखट प्रतिक्रिया देत विरोधक आता भाजपावर टीकेची झोड उठवत आहेत. एका रात्रीत वाढलेल्या ८२ हजार मतांचा फायदा भाजपाला झाल्याचं म्हटलं जात आहे. तर आता निकालानंतरही पोटनिवडणुक वादातितच राहण्याची शक्यता दाट झाली आहे.


मतविभाजनाचा फायदा

निकाल लक्षात घेता भाजपाला मतविभाजनाचा चांगला फायदा झाल्याचं म्हटलं जात आहे. शिवसेना, बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असं मताचं झालेलं विभाजनानं सेनेच्या विजयाचा रथ रोखल्याचंही दिसून येत आहे. २०१४ च्या मोदी लाटेत भाजपाच्या चिंतामण वानगा यांनी ५ लाख ३३ हजार २०१ मत मिळवत बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधवांना तब्बल २ लाख ३९ हजार ५२० मतांनी धूळ चारली होती. लोकसभेत शिवसेना आणि भाजपाची युती असल्यानं भाजपाला पालघर सहज काबीज करता आलं होतं. पण पोटनिवडणुकीत मात्र वानगा कुटुंबियांच्या नाराजी नाट्यानंतर सेनेनं पोटनिवडणुकीत उडी घेतली नि भाजपाला आव्हान दिलं. परिणामी मतांचं चांगलंच विभाजन झालं असून त्याचा फायदा मात्र भाजपाला झाला नि भाजपाचा विजय सोपा झाला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा