Advertisement

“अबू आझमी ठाकरे सरकारचा जावई असेल तर…”, भाजपची कारवाईची मागणी

अबू आझमींच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी तलवारी नाचवल्या, या प्रकरणाची गंभीर दखल घेत अबू आझमी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे.

“अबू आझमी ठाकरे सरकारचा जावई असेल तर…”, भाजपची कारवाईची मागणी
SHARES

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील गोवंडी, शिवाजीनगर भागात जंगी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीदरम्यान मोठी गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांनी तिथं तलवारी देखील नाचवल्या, या प्रकरणाची गंभीर दखल घेत अबू आझमी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे.

अबू आझमी जर ठाकरे सरकारचा जावई असेल तर त्याचा वाढिदवस 'मातोश्री', 'वर्षा' किंवा 'सिल्वर ओक' वर खुशाल साजरा करावा! पण मुंबईच्या रस्त्यांवर गर्दी जमवून, नंग्या तलवारी नाचवण्याचे प्रकार होत असतील, तर त्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे!!, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

अबू आझमी यांच्या वाढदिवसानिम्मित रथातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवाजी नगर सिग्नलपासून ही मिरवणूक घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवर फिरत होती. मिरवणुकीत दुचाकीस्वारांनी प्रचंड धुडगूस घालत वाहतूककोंडी केली. या मिरवणुकीला फटाके फोडून, घोषणा देत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. धक्‍कादायक म्हणजे रथात बसलेल्या अबू आझमी यांनी हातात तलवार घेऊन तिचं प्रदर्शन देखील केलं.

हेही वाचा- प्रदेशाध्यक्ष बदलाचा प्रश्नच नाही, चंद्रकांत पाटलांचा खुलासा

त्यावर प्रसारमाध्यमांनी विचारलं असता, माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा पैसे जमा करुन पूरग्रस्तांना द्या, असं आवाहन मी कार्यकर्त्यांना केलं होतं. मी केकही कापला नाही. पण काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. आता कुणाकुणाला समजावणार. मिरवणुकीदरम्यान माझ्या हाती कुणी लाठी दिली, कुणी तलवार दिली. ती तलवार धारदार नव्हती, तर फक्त दिखाव्यापुरती होती. कार्यकर्त्यांमध्ये जोश असतो. हे कायद्याविरोधी आहे, असं मला वाटत नाही. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये शीख समुदायातील बांधवांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश कुमार यांना तलवार भेट दिली, ही काय नवीन गोष्ट नाही, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही स्टेजवर हातात तलवार घेताना पाहिलंय, असं अबू आझमी म्हणाले.

कोविडसंबंधी नियमांचं उल्लंघन झाल्याचं बरोबर आहे, पण लोकं ऐकत नाहीत, त्यांना समजवायला गेल्यावर ते म्हणतात, आम्हाला काय सांगता, मोदीजींना सांगा, मोदींनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तोंड न झाकता प्रचार केला. कुंभमेळ्यातही नियमांचं उल्लंघन झालं. माझ्या हातात मास्क आहे. गरज असेल तिथं मी लावतो, अशा लोकांना किती समजावणार, असा उलटा प्रश्नही अबू आझमी यांनी केला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा