Advertisement

धनंजय मुंडेंची आमदारकी संकटात?; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

दुसऱ्या लग्नाची माहिती लपविल्याचा आरोप करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार केली आहे.

धनंजय मुंडेंची आमदारकी संकटात?; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या लग्नाची माहिती लपविल्याचा आरोप करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार केली आहे. 

किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पत्नी, मुलं आणि मालमत्तेसंदर्भातील ५ अतिशय महत्वाचे मुद्दे नमूद करत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांनी दुसरं लग्न केल्याचं तसंच दुसरी पत्नी आणि त्यांच्या मुलांची काळजी घेत असल्याचं सार्वजनिकरित्या कबूल केलं आहे. त्यांची दुसरी पत्नी रेणू शर्मा हिच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार, शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप करत मुंबई पोलिसांत (mumbai police) तक्रार दाखल केली आहे.

आपल्या दोन्ही पत्नींच्या नावे मालमत्ता खरेदी केल्याची तसंच दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या मुलांना आपलं नाव दिल्याची जाहीर कबुली देखील त्यांनी दिली आहे. रेणू शर्मा यांच्यासोबत परस्पर सहमतीने संबंध असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. तरीही त्यांनी आॅक्टोबर २०१९ मध्ये निवडणुकीच्या शपथपत्रात आपल्या दोन्ही पत्नी, मुलं आणि त्यांच्या नावे करण्यात आलेली मालमत्ता याबाबतची माहिती लपवली. या सर्व प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

हेही वाचा- धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप, म्हणाले ब्लॅकमेलिंगचा प्रकार..

दरम्यान, धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी फेसबुक या सोशल मीडियावर आपला सविस्तर खुलासा पोस्ट केल्यानंतर ते स्वत:च अडचणीत आले आहेत. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलं आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलं असून स्वीकृती दिलेली आहे.

सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सदभावनेने केलेल्या आहेत. 

तर, मात्र २०१९ पासून करूणा शर्मा त्यांची बहिण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला होता.

(bjp leader kirit somaiya register a complaint against dhananjay munde to election commission in second wife issue)

संबंधित विषय
Advertisement