Advertisement

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप, म्हणाले ब्लॅकमेलिंगचा प्रकार..

माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी, ब्लॅकमेल करणारे आहेत, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप, म्हणाले ब्लॅकमेलिंगचा प्रकार..
SHARES

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत एका महिलेने पोलिसांत धाव घेतली आहे. या महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी, ब्लॅकमेल करणारे आहेत, असं म्हणत धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

धनंजय मुंडे यांनी फेसबुक या सोशल मीडियावर आपला सविस्तर खुलासा पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये मुंडे म्हणतात, कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचं तसंच मीडिया व सोशल मीडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणू शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहिण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केलं आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे.

करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलं आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलं असून स्वीकृती दिलेली आहे.

हेही वाचा- “अशोक चव्हाण यांची भूमिका आरक्षणाच्या बाजूची की काँग्रेसची?”

सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सदभावनेने केलेल्या आहेत. 

मात्र २०१९ पासून करूणा शर्मा त्यांची बहिण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.

या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मे २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलिसांकडे तक्रारसुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतूने व मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केलं होतं. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे.

सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या विरोधात असं साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी मा. उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही. माझी या संदर्भात प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल म्हणून अधिक भाष्य टाळावं, अशी विनंती आहे.

(rape allegation against maharashtra social justice minister dhananjay munde)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement