Advertisement

महाविकास आघाडीच्या ओळख परेडमध्ये फक्त १३० आमदार- नारायण राणे

शिवसेने, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या आमदारांची मुंबईत ग्रँड हयात हॉटेल मध्ये ओळख परेड झाली.

महाविकास आघाडीच्या ओळख परेडमध्ये फक्त १३० आमदार- नारायण राणे
SHARES

शिवसेने, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या आमदारांची मुंबईत ग्रँड हयात हॉटेल मध्ये ओळख परेड झाली. यावेळी महाविकास आघाडीनं 'आम्ही १६२' असं शक्तीप्रदर्शन केलं. तसंच, एकजूट असल्याची शपथही घेतली. परंतु, यावेळी '१६० नव्हे तर फक्त १३० आमदारच उपस्थित होते. त्यातील ३० आमदार गैरहजर होते’, असं भाजपचे नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसंच, 'शिवसेनेचे सर्वाधिक आमदार उपस्थित असल्यानं त्यांना फुटीचा मोठा फटका बसेल’, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, त्यांचे हे सर्व आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फेटाळून लावले.


ओळख परेड

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ग्रँड हयात हॉटेलमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या आमदारांची ओळख परेड करण्यात आली होती. त्यावर नारायण राणे यांनी टीका केली.


राणेंची टीका

'ग्रँड हयात हॉटेलमध्ये १६० आमदार जमल्याचा दावा खोटा आहे. तिथे १३० आमदार होते. ३० आमदार गायब होते. गर्दी दिसावी म्हणून हॉटेलमध्ये विधान परिषदेतील आमदारांना उभे करण्यात आलं होतं. या ओळख परडेला शिवसेनेचे सर्वाधिक आमदार गैरहजर होते. त्यापैकी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी आपल्याशी संपर्क साधला आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतरच त्याची माहिती तुम्हाला देण्यात येईल. काँग्रेसचेही आमदार नाराज असल्यानं ते सुद्धा फुटतील', असं नारायण राणे यांनी म्हटलं.


विधानसभेतील चित्रं वेगळं

'जरी तिन्ही पक्षांच्या आमदारांनी कितीही शपथ घेतली असली तरी प्रत्यक्ष विधानसभेतील चित्रं वेगळं असेल. या आमदारांपैकी किती आमदार प्रामाणिक असतील हे सांगता येत नाही. विधानसभेत बहुमतावेळी हे आमदार आमच्या बाजूनं आलेले असतील आणि विधानसभा अध्यक्षही आमचाच झालेला पाह्यला मिळेल’, असंही त्यांनी म्हटलं.


सरकार स्थापनेचा सोहळा

'भाजपने रात्रीच्या अंधारातच सरकार स्थापनेचा सोहळा उरकून आणला. हे सर्व करण्याआधी नारायण राणेंना भाजपने विश्वासात घेतलं असतं तर हा गोंधळ उडाला नसता. भाजपने राणेंना डावलून मोठी घोडचूक केली. त्यांनी राणेंचं अवमूल्यन केलं आहे’, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.


गटनेतेपदाची मान्यता

'राष्ट्रवादीचे ५१, काँग्रेसचे ४२, समाजवादी पार्टीचे २, राजू शेट्टी यांच्या पक्षाचा एक, शिवसेनेचे ५६ आणि शिवसेना समर्थक ८ अपक्ष आमदारही उपस्थित होते. त्यामुळे आकडेवारी तुमच्यासमोरच आहे, त्याचा काय अर्थ काढायचा तो काढा’, असंही त्यांनी म्हटलं. 'अजून विधानसभेत आमदारांनी शपथ घेतलेली नाही. त्यामुळं अजित पवार यांना विधानसभेनं गटनेतेपदाची मान्यता देण्याचा प्रश्नच येत नाही. आमदारांनी विधानसभेत सदस्यत्वाची शपथ घेतलेली नसल्यानं त्यांना त्यांचा नेता बदलण्याचा अधिकार आहे. त्याच अधिकारातून अजितदादांना गटनेतेपदावरून दूर करण्यात आलं आहे. त्यामुळं अजितदादांचा व्हिप लागू होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही', असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा -

‘वेट अ‍ॅण्ड वॉच’, संजय राऊतांचं सूचक ट्विट

महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात फैसला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा