हवं तर मला पक्षातून काढा, पंकजा मुंडेंचं पक्षनेतृत्वालाच आव्हान

हवं तर पक्षाने मला सोडावं, असं थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान देत भाजप नेत्या ​पंकजा मुंडे​​​ यांनी आपल्या मनातील खदखद पहिल्यांदाच व्यक्त केली.

SHARE

हा माझ्या बापाचा पक्ष आहे. बेईमानी माझ्या रक्तात नाही. त्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही. हवं तर पक्षाने मला सोडावं, असं थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान देत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद पहिल्यांदाच व्यक्त केली. 

भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीमिनित्त मुंडे यांनी बीड, परळी, गोपीनाथ गड इथं गुरूवारी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, खासदार डाॅ प्रीतम मुंडे यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रकाश मेहता इ. नेते उपस्थित होते. या मेळाव्याच्या माध्यमातून मुंडे आपल्या आगामी राजकीय वाटचालीवर भाष्य करणार असल्याने त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या मेळाव्याच्या माध्यमातून यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नवी फळी उभी केल्याचं पाहायला मिळालं. 

हेही वाचा- गोपीनाथ मुंडे असते, तर माझ्यावर अन्याय झाला नसता… खडसेंची खंत

यावेळी केलेल्या भाषणात मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांनी अनेकांना पक्षात मोठं केलं. परंतु त्यांनी कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. माझ्या रक्तातही त्यांचेच संस्कार आहेत. त्यामुळे मी बंड करणार नाही. मात्र पंकजा मुंडे पक्ष सोडणार, त्या पक्षावर दबाव टाकत आहेत, असं काहीजण म्हणताहेत. अशा अफवा माध्यमांमध्ये कुणी पसरवल्या? याचा पक्षाने शोध घ्यावा, मी पक्ष सोडणार की नाही हे पक्षानेच सांगावं आणि लोकांच्या मनातली शंका दूर करावी. मी कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही. हवं तर पक्षाने मला सोडावं. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. मला कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करावं.

हेही वाचा- पंकजा मुंडे अजूनही नाराज? भाजपच्या बैठकीला गैरहजर

पंकजा मुंडे दरवाजा लावून घरात बसणाऱ्यांपैकी नाही. सत्ता नव्हती तेव्हाही मी संघर्षयात्रा काढलीच होती. आताही गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझं काम सुरूच ठेवणार. राज्यभर दौरे काढून माझी वज्रमुठ आणखी घट्ट करणार असं म्हणत, त्यांनी पक्षनेतृत्वावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या