Advertisement

कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येत नाही- प्रविण दरेकर

कायद्यासमोर कुणालाही पळवाट काढता येत नाही. कायदा हा सगळ्यांना सारखा असतो.

कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येत नाही- प्रविण दरेकर
SHARES

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावलं असताना अनिल देशमुखांनी (anil deshmukh) मात्र आपण प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, असं सांगितलं आहे. ऑनलाईन जबाब देण्याची आपली तयारी असल्याचं अनिल देशमुख यांनी ईडीला पत्र पाठवून सांगितलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येत नाही! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात तपास यंत्रणा योग्य तो निर्णय घेतील, असं मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. 

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, कायद्यासमोर कुणालाही पळवाट काढता येत नाही. कायदा हा सगळ्यांना सारखा असतो. कायद्यासमोर कुणीही कितीही कारणं काढण्याचा प्रयत्न केला, तरी तो फार लांब जाऊ शकत नाही. त्यामुळे कायद्यामध्ये वयाच्या बाबतीत ज्या सवलती असतील, आजारपणाच्या बाबतीत जी सूट असेल, निश्चितपणे ते गृहित धरूनच तशा प्रकारच्या सवलती यंत्रणा, कोर्ट देऊ शकते.

भाजपच्या (bjp) दबावामुळेच या यंत्रणा राज्यातील नेत्यांवर कारवाई करत असल्याचा जो आरोप होतोय, त्यावर बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितलं की, केंद्रावर आरोप करण्यापलिकडे ते काहीच करू शकत नाही. ईडी नावाची तपास यंत्रणा भाजपने स्थापन केलेली आहे का? तर काँग्रेसच्या काळात ही यंत्रणा उभी राहिलेली आहे. त्यानंतर या देशात कशा प्रकारे कारभार झाला हे देशवासियांना माहीत आहे. आता आपल्या बाबतीत हे घडतंय म्हणून असे आरोप करायचे हे उचित ठरणारं नाही.

हेही वाचा- अनिल देशमुखांवर निराशेपोटी कारवाई- शरद पवार

त्याही वेळेला सरकार टिकवण्यासाठी सपा, बसपा विरोधात या यंत्रणांचा कशा रितीने वापर करण्यात आला होता, हे देशाने पाहिलेलं आहे. मात्र त्याचं समर्थन करायचं कारण नाही. आपलं संविधान इतकं मजबूत आणि सशक्त आहे की देशातील प्रत्येक नागरिकाचा हक्क आबाधित ठेवण्याचं प्रावधान या कायद्यात आहे. तपास यंत्रणेला वाटलं म्हणून काहीही केलं, असं होत नसतं. आरोप, तक्रारींच्या अनुषंगानेच योग्य ती कारवाई होत असते, असं प्रविण दरेकर यांनी सांगितलं.

ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख यांनी ईडीला पत्र लिहून विनंती केली आहे की, मी जवळपास ७२ वर्षांचा आहे, उच्च रक्तदाब आणि हृदयासंदर्भातील समस्या आणि विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहे. २५ जूनला जबाब नोंदवताना मी बरेच तास आपल्याशी संवाद साधला. म्हणूनच, आज स्वत: उपस्थित राहणं योग्य नाही व मी माझा अधिकृत प्रतिनिधी पाठवत आहे.

ईडीने पाठवलेल्या समन्समध्ये वैयक्तिक स्वरुपात उपस्थित राहावं लागेल, असं स्पष्ट केलेलं नाही. तसंच ईडीने ‘ईसीआयआर’ची प्रत दिल्यानंतर त्यांनी मागितलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे सादर करणार असल्याचं देखील अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.   

हेही वाचा- संजय राऊतांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये, चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा