Advertisement

संजय राऊतांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये, चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर

वाझे जेलमधून आपल्या पापाच्या भागीदारांची नावं घेणार तर कारवाई होणारच ना..

संजय राऊतांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये, चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर
SHARES

भाजप कार्यकारणीत काही जणांवर CBI चौकशी करा म्हणून मागणी झाली तेव्हा संजय राऊतांच्या छातीत धडकी का भरली ?? वाझे जेलमधून आपल्या पापाच्या भागीदारांची नावं  घेणार तर कारवाई होणारच ना.. त्यामुळे संजय राऊतांनी (sanjay raut) आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये, अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लक्ष्य करताना म्हटलं, सत्तेचा गैरवापर करून एका महिलेला त्रास देण्यात आला. एवढंच नाही, तर ही महिला जेव्हा दाद मागायला न्यायालयात गेली तेव्हा तिला खोट्या गुन्ह्यात अडकवलं. अशा निरंकुश आणि शोषक वृत्तीच्या लोकांना प्रभू श्री रामचंद्रांचं महत्त्वही कळणार नाही आणि रामजन्मभूमीचं पावित्र्यही कळणार नाही. 

कालच्या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही लोकांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मला हेच कळत नाही की संजयजींच्या छातीमध्ये का कळ आली. वाझे तिकडं जेलमध्ये बसून त्याच्या पापांच्या भागीदारांची नावं घेतोय, तेव्हा कारवाई तर होणारच, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

हेही वाचा- आधी अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा तपास करा, संजय राऊतांचा संताप

या कार्यकारिणीच्या बैठकीत ओबीसी, मराठा आरक्षण, सरकारने बारा बलुतेदारांना एक रुपयाचंही पॅकेज दिलेलं नाही, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मदत देण्याचं तर सोडा, त्यांना त्यांच्या हक्काचे पिक विम्याचे पैसेसुद्धा या सरकारने दिलेले नाहीत. त्यावर संजय राऊतांनी भाष्य करावं, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

माझं आवाहन आहे त्यांना की त्यांनी या सगळ्या प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकारला जाब विचारला पाहिजे आणि त्यांच्या शौर्याचा परिचय पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला करून द्यायला पाहिजे, बाकी तर जनता सगळं जाणतेच, असा टोलाही चित्रा वाघ यांनी राऊतांना हाणला.

दरम्यान, निलंबित पोलीस सहायक निरिक्षक सचिन वाझे यांनी सीबीआयला लिहिलेल्या पत्रात परिवहनमंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पैसे वसुलीसंदर्भात आरोप केले आहेत. या आरोपांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी भाजपची (bjp) मागणी आहे. याबाबतचा ठराव गुरूवारी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला आहे.

त्यावर जमीन व्यवहारांचा तपासच करायचा असेल, तर ईडी आणि सीबीआयने अयोध्येतील महापौर ऋषिकेश उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी रामजन्मभूमी न्यासासोबत केलेल्या जमीन व्यवहारांची चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.

(bjp leader chitra wagh reply to sanjay raut on demand of CBI inquiry of ayodhya land corruption case)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा