Advertisement

आधी अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा तपास करा, संजय राऊतांचा संताप

ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणेने सीबीआयने अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा तपास करावा, असा खोचक सल्ला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

आधी अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा तपास करा, संजय राऊतांचा संताप
SHARES

जमीन व्यवहारांचा तपासच करायचा असेल, तर अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आणि केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा तपास करावा असा खोचक सल्ला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. 

निलंबित पोलीस सहायक निरिक्षक सचिन वाझे यांनी सीबीआयला लिहिलेल्या पत्रात परिवहनमंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पैसे वसुलीसंदर्भात आरोप केले आहेत. या आरोपांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी भाजपची मागणी आहे. याबाबतचा ठराव गुरूवारी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. 

तर, दुसरीकडे राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे.

त्यावर मुंबईतील प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले की, जमीन व्यवहारांचा तपासच करायचा असेल, तर ईडी आणि सीबीआयने अयोध्येतील महापौर ऋषिकेश उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी रामजन्मभूमी न्यासासोबत केलेल्या जमीन व्यवहारांची चौकशी करावी. तपास यंत्रणांसाठी हे अत्यंत योग्य प्रकरण आहे. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भाजपच्या (bjp) राष्ट्रीय कार्यकारणीलाही अयोध्येत जमीन घोटाळा झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे, असा दावा राऊत यांनी केला.

हेही वाचा- नवी मुंबई विमानतळाची मालकी अदानी समूहाकडं

अनिल परब असतील किंवा अजित पवार (ajit pawar) यांच्यासंदर्भात काही आरोप असतील तर महाराष्ट्रातील तपास यंत्रणा त्या आरोपांची चौकशी करण्यात सक्षम आहे, न्यायालयं आहेत. ईडी किंवा सीबीआयशी आमचं काही वैयक्तिक वैर नाही. त्या राष्ट्रीय संस्था आहेत. देशाचं नुकसान होणारी घटना असेल, मनी लाँड्रिंग असेल तर नक्कीच सीबीआय आणि ईडीने तपास केला पाहिजे, असं मत संजय राऊत (sanjay raut) यांनी व्यक्त केलं. 

मात्र, सध्या ज्या प्रकारची प्रकरणं या तपास यंत्रणांकडे सोपवली जात आहेत, त्यावरून हे राजकीय सूडनाट्य वाटत आहे. परंतु यातून ई़डी आणि सीबीआयची नाहक बदनामी होत आहे. सीबीआय आणि ईडी पार्टीचे सदस्य आहेत का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला २ वर्षे पूर्ण होत आली असून यापुढंही सरकार चांगल्या पद्धतीने चालणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करून कोणाला महाराष्ट्रात आपलं सरकार येईल असं वाटत असेल तर ते अंधारात चाचपडत आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.     

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा