माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचा छापा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनायलयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी छापा टाकला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचा छापा
SHARES

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनायलयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी छापा टाकला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

गुरूवारी रात्रीच ईडीचं पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. त्यानंतर शुक्रवारी सकाळी मुंबईहून आलेल्या पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने अनिल देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडे धाड टाकली. या धाडीदरम्यान अनिल देशमुख यांच्या घराबाहेर सीआरपीएफ जवानांना तैनात करण्यात आलं आहे. 

याआधी सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची ८ तास कसून चौकशी केली होती. त्यानंतर सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरचा अभ्यास करून ११ मे रोजी ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात १६ जून रोजी ईडीच्या ३ पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापे टाकले होते. त्यानंतर ईडीने हा छापा टाकला आहे.  

हेही वाचा- मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम सुरू, अनिल देशमुखांचा केंद्रावर खळबळजनक आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. अनेक अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या ते भ्रष्ट मार्गाने करत होते, असे आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आले आहेत.

शंभर कोटींचं वसुली प्रकरण आणि बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या आरोपांत तथ्य असेल तर या पैशाचं नेमकं झालं? काय याचा तपास ईडी करत आहे. या पैशांचा वापर कसा करण्यात आला, हवाला मार्फत ते बाहेर पाठवण्यात आले आहेत का? किंवा कोलकात्यातील शेल कंपन्यांच्या माध्यमातून त्याची गुंतवणूक केली गेली आहे का? याचा तपास ईडी करत असल्याचं म्हटलं जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गृहमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरणी कारवाई केली. त्याचबरोबर सीबीआयला महाराष्ट्रात कुठणाची तपास करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मुभा होती, त्यावर आॅक्टोबर महिन्यात आम्ही निर्णय घेऊन शासनाच्या परवानगीशिवाय सीबीआय महाराष्ट्रात कोणतीही चौकशी करू शकणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय घेतला.

त्याचबरोबर दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी जी आत्महत्या केली, हा प्रश्न जेव्हा विधानसभेत उपस्थित झाला, तेव्हा आमदारांच्या मागणीनुसार या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमली. या सर्व प्रकरणांमुळे केंद्र शासन बहुतेक नाराज असू शकतं. त्यामुळेच माझी सीबीआय, ईडीच्या माध्यमातून चौकशी होत आहे, असा दावा अनिल देशमुख यांनी केला होता.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा