Advertisement

Ram Mandir: हा तर प्रभू रामचंद्रांनाच विरोध, उमा भारती पवारांवर भडकल्या

भाजपच्या आक्रमक नेत्या उमा भारती यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर आपल्या शैलीत पलटवार केला आहे. पवार यांनी केलेला हा विरोध थेट प्रभू रामचंद्रांना केल्याचं मत उमा भारती यांनी मांडलं आहे.

Ram Mandir: हा तर प्रभू रामचंद्रांनाच विरोध, उमा भारती पवारांवर भडकल्या
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमावर केलेल्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. भाजपच्या आक्रमक नेत्या उमा भारती यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर आपल्या शैलीत पलटवार केला आहे. पवार यांनी केलेला हा विरोध थेट प्रभू रामचंद्रांना केल्याचं मत उमा भारती यांनी मांडलं आहे. (bjp leader uma bharti slams ncp chief sharad pawar over ram mandir comment)

काय म्हणाल्या उमा भारती?

मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती म्हणाल्या की, शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणारं नाही, तर प्रभू रामचंद्रांना विरोध करणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २ तासांसाठी जर अयोध्येला गेले, तर अशी कुठली अर्थव्यवस्था कोसळेल? पंतप्रधान मोदी असे व्यक्ती आहेत, जे ४ तासांपेक्षा जास्त वेळ झोपत नाहीत आणि २४ तास काम करतात. आजपर्यंत त्यांनी कधीही सुट्टी घेतलेली नाही. ते विमान प्रवासात देखील कामच करतात. मला त्यांचा स्वभाव ठाऊक आहे. प्रभू रामचंद्रांना त्यांनी २ तास दिले, तर काय होणार आहे?

हेही वाचा -  "राम मंदिर होईल, तेव्हाच कोरोना जाईल.."! 

पवार यांचं विधान काय?

जेव्हा अयोध्येत (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) बांधून पूर्ण होईल, त्याच दिवशी कोरोना (Coronavirus) जाईल, असं मोदी सरकारला वाटत आहे. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत देखील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा घाट घातला जातोय. सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. परंतु आमच्यासाठी तर कोरोना संकटाशी मुकाबला करणंच महत्त्वाचं आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राम मंदिराच्या प्रस्तावित भूमिपूजन कार्यक्रमावर भाष्य केलं होतं. 

एका कार्यक्रमानिमित्त सोलापुरात आलेल्या शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांनी राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या तारखेवर प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले की, कोरोनामुळे देशातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. परंतु काही लोकांना वाटतं की राम मंदिर उभारल्यावर कोरोना निघून जाईल. त्याऐवजी सरकारने लाॅकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीची चिंता केली पाहिजे. कुठलं काम किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला ठरवावं लागेल, असं भाष्य शरद पवार यांनी केलं होतं. 

पंतप्रधानांच्या हस्ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरासाठी कोन शीला बसवण्याचा कार्यक्रम करण्यात येईल. येत्या ५ आॅगस्ट रोजी पंतप्रधान मोदी या कार्यक्रमासाठी अयोध्येला जातील. पंतप्रधान झाल्यापासून मोदी पहिल्यांदाच अयोध्येला जाणार आहेत. भूमिपूजन कार्यक्रमात श्रीराम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास ४० किलो वजनाच्या चांदीची शीला समर्पित करतील.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा