Advertisement

Ganesh Festival 2020: कोकणी माणसांशी सरकार असं का वागतंय?- आशिष शेलार

ग्रामस्थ आणि चाकरमान्यांत दरी वाढतेय. आमच्या कोकणी माणसांशी राज्य सरकार असं का वागतंय? असा प्रश्न भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

Ganesh Festival 2020: कोकणी माणसांशी सरकार असं का वागतंय?- आशिष शेलार
SHARES

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना परवानगी देणार की नाही? लालबागचा राजा आणि गणेशभक्त यांची ताटातूट केली त्याचप्रमाणे कोकणवासियांचीही राज्य सरकार ताटातूट करणार? ग्रामपंचायतीना क्वारंटाईन सेंटरमध्ये गरम पाणी, शौचालये, औषधांसाठी ना विशेष निधी दिला, ना गणेशोत्सवाबाबत वेळीच निर्णय जाहीर केला. रेल्वेमंत्री विशेष गाड्या सोडायला तयार; पण राज्य सरकारची मागणीच नाही. ग्रामस्थ आणि चाकरमान्यांत दरी वाढतेय. आमच्या कोकणी माणसांशी राज्य सरकार असं का वागतंय? असा प्रश्न भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. (bjp mla ashish shelar wrote a letter to cm uddhav thackeray over ganesh festival in konkan)

यासंदर्भात आशिष शेलार म्हणतात की, गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाता येईल की नाही या शंकेने चाकरमान्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोकणातील ग्रामस्थांच्या मनामध्ये देखील भीती आहे. ज्या पद्धतीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्याकडे पाहता कोकणात येणाऱ्यांना क्वारंटाईन करावं लागेल, असं त्यांचं मत आहे. सरकार मात्र आपली भूमिका का स्पष्ट करत नाही, असा आमचा सवाल आहे. 

कोकणात जाणाऱ्या रेल्वे देण्याची केंद्र सरकारची तयारी असताना सरकार या रेल्वे का मागत नाही, या प्रश्नाचं उत्तर येत नाही. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची २५० रुपये दर निश्चित केलेली अँटीबाॅडी टेस्ट मोफत करून सरकार त्यांना सेवा देणार आहे का, ग्रामपंचायतीच्या सरपंचांना तेथील क्वारंटाईन सेंटरसाठी विशेष निधी पूर्वीही दिला नाही, यापुढं देणार का? याचीही स्पष्टता करत नाही. यामुळे ग्रामस्थ आणि चाकरमानी यातील दरी राज्य सरकार का वाढवतंय? असा आमचा त्यांना प्रश्न आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

हेही वाचा - केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सव यंदा 'असा' होणार साजरा

आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिलं आहे.

  • आपल्या पत्रात शेलार यांनी क्वारंटाईनचे १४ दिवस पकडता कोकणात जाण्यासाठी अवघे १५ दिवस हातात असताना सरकारने अद्याप आपला निर्णय का घोषित केलेला नाही?
  • १४ दिवस क्वारंटाईन व्हायचं झाल्यास ५ आॅगस्टच्या आधी कोकणात चाकरमान्यांना जावं लागेल. यासाठी लागणारे पास आणि वाहनाची सुविधा कधीपासून उपलब्ध होणार? प्रवासाला कधीपासून कधीपर्यंत परवानगी असणार?
  • गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्या सोडण्याची केंद्र सरकारची तयारी आहे. मात्र तशी मागणी अद्याप सरकारकडून करण्यात आलेली नाही. सरकारने याबाबत अद्याप विचार का केलेला नाही?
  • सरकारने अँटीबाॅडी टेस्टची किंमत २५० रुपये निश्चित केली आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची ही टेस्ट मोफत करून त्यांना प्रवासाची मुभा का दिली जात नाहीय?
  • गणेशोत्सव साधेपणाने आणि विधीवत करावा, हे वेळेत घोषित न केल्याने ज्याप्रमाणे लालबागच्या राजाने यंदाचा गणेशोत्सव रद्द केला, तशी कोंडी सरकार चाकरमान्यांची तर करत नाही ना?

सरकार वेळीच निर्णय जाहीर करत नसल्याने चाकरमानी आणि कोकणाती ग्रामस्थांच्या मनात गोंधळ, भीती आणि असंतोष निर्माण झाल्याचं मत आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे. 

हेही वाचा - Ganesh Festival 2020: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा