Advertisement

धमकी देत आहात काय? भाजपचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

माझ्याविरुद्ध केवळ गलिच्छ राजकारण सुरू आहे. या प्रकरणी मी आजही संयमानेच वागत आहे, असा खुलासा करणाऱ्या आदित्य यांना तुम्ही एकप्रकारे धमकी देत आहात का? असा प्रश्न भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.

धमकी देत आहात काय? भाजपचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकणावरून शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना भाजपकडून सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. या प्रकरणाचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही. माझ्याविरुद्ध केवळ गलिच्छ राजकारण सुरू आहे. या प्रकरणी मी आजही संयमानेच वागत आहे, असा खुलासा करणाऱ्या आदित्य यांना तुम्ही एकप्रकारे धमकी देत आहात का? असा प्रश्न भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. (bjp mla atul bhatkhalkar criticises aaditya thackeray statement on sushant singh rajput suicide case)

राज्य मंत्रीमंडळातील सदस्याने ‘मी आजही संयम ठेवून आहे’ अशा प्रकारचे उद्गार काढणे म्हणजे ते धमकी देत आहेत का? असा अर्थ लोकांनी घ्यायचा का? असा प्रश्नही आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. तसंच संयम सुटला तर काय करणार आहात? हे सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला कळण्याची आवश्यकता आहे. कारण मंत्रीमंडळातील आपल्याच एका सहकाऱ्यावर सामान्य नागरिकाला मारहाण केल्याचे आरोप झाले होते. तशा पद्धतीचं काही करणं अपेक्षित आहे का? त्यामुळे असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला तर याला जबाबदार कोण? असं अतुल भातखळकर यांनी विचारलं आहे.

हेही वाचा - मी बाळासाहेबांचा नातू! सुशांत सिंह प्रकरावरून आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन


मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. परंतु ५० दिवसांनंतर साधा एफआयआर दाखल केलेला नाही. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास कसा करत आहेत याचंही कायदेशीर ज्ञान महाराष्ट्राच्या जनतेला मंत्री महोदयांनी देण्याची आवश्यकता आहे, अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी केली. 

आदित्य ठाकरे हे पर्यावरणमंत्री आहेत. कुठल्याही फौजदारी प्रकरणाचा तपास हा गृह विभागाअंतर्गत येतो, असं असताना या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत, हे त्यांना कसं कळलं? गेल्या काही दिवसांत ते मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटले, अशी चर्चा आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी ही सखोल तपासाची माहिती आपणहून घेतली की पोलीस आयुक्तांनी त्यांना दिली, याचाही त्यांनी खुलासा करावा. कारण कुठल्याही फौजदारी प्रकरणाची माहिती आरोपपत्र दाखल हाेईपर्यंत तपास अधिकारी कुणालाही देऊ शकत नाही. असं असताना पोलीस सखोल तपास करत आहेत, हे ज्ञान आदित्य ठाकरे यांना कुठून प्राप्त झालं हे जनतेस कळणं आवश्यक आहे. याचा त्यांनी तातडीने खुलासा न केल्यास यासंदर्भात आपण योग्य ती कायदेशीर पावलं उचलू असंही अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा