Advertisement

मी बाळासाहेबांचा नातू! सुशांत सिंह प्रकरावरून आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन

महाराष्ट्र सरकारचं यश आणि लोकप्रियता ज्यांच्या डोळ्यात खुपते आहे, त्यांनीच सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं घाणेरडं राजकारण सुरू केल्याचं सडेतोड उत्तर आदित्य यांनी दिलं आहे.

मी बाळासाहेबांचा नातू! सुशांत सिंह प्रकरावरून आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचं सत्र रंगलेलं आहे. यांत काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि सुशांतची मैत्रीण रिया चकवर्ती एका कारमध्ये असल्याचा दावा करणारे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरून आदित्य ठाकरे यांना विरोधकांकडून लक्ष्यही करण्यात येत होतं. अखेर आदित्य यांनी आपलं मौन सोडून  याप्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून खुलासा केला आहे. महाराष्ट्र सरकारचं यश आणि लोकप्रियता ज्यांच्या डोळ्यात खुपते आहे, त्यांनीच सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं घाणेरडं राजकारण सुरू केल्याचं सडेतोड उत्तर आदित्य यांनी दिलं आहे. (aaditya thackeray clarifies on sushant singh rajput suicide case) 

आदित्य ठाकरे यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा परभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुदा महाराष्ट्र सरकारचं यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं घाणेरडं राजकारण सुरू केलं आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसंच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी आरोप करणाऱ्यांना सुनावलं आहे.

हेही वाचा- सुशांत आत्महत्या प्रकरण ! बिहार पोलिस आणि मुंबई पोलिस आमने सामने

मुळात या प्रकरणाचा माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बाॅलिवूड हे मुंबई शहराचं एक महत्त्वाचं अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस याप्रकरणी खोलवर तपास करत आहेत. व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे. पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही, तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चपराकही आदित्य ठाकरे यांनी लगावली आहे.

मी हिंदूहृहयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल, असं कृत्य माझ्या हातून कदापी होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रकरणी मी आजही संयमानेच वागत आहे. अशा प्रकारे चिखलफेक करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल, या भ्रमात कुणीही राहू नये, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी पोलिसांवरही विश्वास दाखवला आहे.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा