Advertisement

तिजोरीतील पैशांचा चुथडा थांबवा, ठाकरे सरकारला भाजपचा इशारा


तिजोरीतील पैशांचा चुथडा थांबवा, ठाकरे सरकारला भाजपचा इशारा
SHARES

मेट्रो कारशेड उभारण्यासाठी एमएमआरडीएच्या ताब्यात देण्यात आलेल्या कांजूरमार्गमधील जागेवर केंद्र सरकारने आपला हक्क सांगताच भाजपच्या नेत्यांना पुन्हा बळ आलं आहे. राज्य सरकारचा निर्णय याप्रकरणी कसा चुकला आहे तसंच जनतेच्या पैशांची कशी उधळपट्टी होतेय यावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात आहे.

वैयक्तिक द्वेष करून राज्य कधीच चालवता येत नाही, हे ठाकरे सरकारने ध्यानात घेऊन आपली अब्रू, जनतेचे हाल आणि तिजोरीच्या पैशांचा चुथडा त्वरित थांबवावा. दुसऱ्याच्या जीवावर संकल्प सोडू नये, अशी खोचक टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर केली आहे. (bjp mla atul bhatkhalkar slams thackeray government over metro car shed in kanjurmarg)

याआधी मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यामागे राज्य सरकारचा कुहेतू दिसून येतोय. ज्यावेळी यासंबंधीची घोषणा झाली त्याचवेळेला प्रतिक्रिया देताना आम्ही म्हटलं होतं, अहंकारी राजा आणि विलासी राजपूत्र यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय. आज ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर येताहेत त्यावरून तरी हेच दिसतंय. कारशेड कांजूरमार्गला हलवण्याआधी मिठागर आयुक्तांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न देखील आम्ही उपस्थित केला होता. केंद्राच्या पत्राने गोष्ट स्पष्ट झालेली आहे. अहंकारी प्रवृत्तीने घेतलेल्या निर्णयाचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय. 

कांजूरमार्ग इथं सुरू असलेलं मेट्रो कारशेडचं काम ताबडतोब थांबवा. कारण या जागेवरील हक्क आम्ही अजून सोडलेला नाही. त्यामुळे कांजूरमार्गची जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवण्यात आलं आहे. या पत्रामुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र विरूद्ध राज्य सरकार असा वाद पुन्हा विकोपास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा