महिला आयोगाच्या दणक्यानंतर राम कदमांचा माफीनामा

राम कदम यांनी अखेर तीन दिवसांनी ट्विटरवर माफी मागितली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी आणि राज्यभरातील महिलांनी चांगलाच समाचार घेतल्यानंतर बुधवारी संध्याकाळी त्यांनी फक्त दिलगीरी व्यक्त केली होती. मात्र महिला आयोगाच्या दणक्यानंतर अखेर गुरुवारी ट्विटरवर त्यांनी माफीनामा सादर केला.

SHARE

महिलांविषयी बेताल वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांनी अखेर तीन दिवसांनी ट्विटरवर माफी मागितली आहे.
त्यांच्या या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी आणि राज्यभरातील महिलांनी चांगलाच समाचार घेतल्यानंतर बुधवारी संध्याकाळी त्यांनी फक्त दिलगीरी व्यक्त केली होती. मात्र महिला आयोगाच्या दणक्यानंतर अखेर गुरुवारी ट्विटरवर त्यांनी माफीनामा सादर केला.


काय आहे ट्विट ?

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला, त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे,' असं  ट्विट राम कदम यांनी केलं आहे.


काय म्हणाले होते कदम?

राम कदम यांचा घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना ताबा सुटला, ते म्हणाले, एखाद्या मुलीला प्रपोज केले आणि तिने नकार दिला, तर त्या मुलाने आपल्या आई-वडिलांना आणावे, आई वडिलांनी मुलगी पसंत असल्याचं सांगितल्यानंतर त्या मुलीला पळवून आणण्यासाठी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन. हा शब्द तुम्हाला देतो.


अखेर माफीनामा

महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राम कदम चांगलेच वादात सापडले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक महिलांनी राम कदम यांच्याविरोधात सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत हिंमत असेल तर आम्हाला फक्त स्पर्श करून दाखवा, असं खुलं आव्हान दिलं होतं. तर विरोधकांनी टीकेची झोड उडवत राम कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली. या सर्व घडामोडींनंतर अखेर बुधवारी संध्याकाळी राम कदम यांनी नमते घेत दिलगिरी व्यक्त केली.

मात्र महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी बुधवारी रात्री उशिरा राम कदम यांच्याविरोधात कारवाईचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे राम कदम यांना आक्षेपार्ह विधानाबाबत पुढच्या आठ दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिल्यानंतर ते दिलगिरीवरून माफीनाम्यावर आले. आता मुख्यमंत्री आणि भाजप पक्षाकडून कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.


ट्विटवरून माफी राज्याला मान्य नाही. त्यांनी जनतेसमोर माफी मागायला हवी आहे, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, तीन दिवसांनंतर माफी मागितली आहे, आई बहिणीची अब्रू रस्त्यावर आहे. त्यांनी कितीही माफी मागावी त्यांना क्षमा नाही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावं या मागणीवर आम्ही ठाम आहे.

- विखे पाटील , विरोधीपक्ष नेते, विधानसभा


कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, माफी द्यायची की नाही? हे महाराष्ट्रातील माता भगिनी ठरवतील, माफी मागून उपयोग नाही. वेळ निघून गेली आहे .

- संदीप देशपांडे, सरचिटणीस, मनसे 


हेही वाचा -

Video: माफी नाही फक्त दिलगिरी, राम कदम नमले

संबंधित विषय
ताज्या बातम्या