Advertisement

संदीप सिंहसोबत भाजपचं कनेक्शन काय? काँग्रेसचा प्रश्न

सध्या भाजपच्या अनेक बड्या नेत्यांसोबत असलेले त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असल्याने संदीप सिंहच्या भाजप कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

संदीप सिंहसोबत भाजपचं कनेक्शन काय? काँग्रेसचा प्रश्न
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सिने निर्माता संदीप सिंह या नावाची चर्चा जोर धरु लागली आहे. संदीप सिंहविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. तर सध्या भाजपच्या अनेक बड्या नेत्यांसोबत असलेले त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असल्याने संदीप सिंहच्या भाजप कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. (bjp must clarify connection with film producer sandeep singh demands congress spokesperson sachin sawant)

सुशांतचे कौटुंबिक मित्र निलोत्पल मृणाल यांनी सुशांतचा जवळचा मित्र असलेल्या संदीप सिंह यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. बॉलिवूडला क्लीन चिट देणारा आणि सुशांतच्या मृत्यू सामान्य म्हणणारा संदीप सिंह कोण आहे? तो कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय की बॉलिवूडमधील कोणी त्याला हे सगळं करायला सांगितलं आहे? याची चौकशी करण्याची गरज आहे, असं प्रसार माध्यमांशी बोलताना मृणाल म्हणाले होते. 

तर आता राज्यातील अनेक बड्या नेत्यांसोबत संदीप सिंह यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने सचिन सावंत यांनी संशय व्यक्त केला आहे. संदीप सिंहने भाजपच्या कार्यालयात ५३ वेळा कॉल केल्याचं उघड झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक तयार करण्याचे काम हे भाजपने संदीप सिंहला का दिलं?, गुजरात सरकारने संदीप सिंहच्या कंपनीसोबत १७७ कोटी रुपयांचा MOU केला होता. याचं उत्तर भाजपने देणं गरजेचं असल्याचं सचिन सावंत म्हणाले आहेत.  

हेही वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरण : अस्वस्थ वाटू लागल्याने ‘हा’ तपास अधिकारी सुट्टीवर

संदीप सिंह याने भाजपच्या महाराष्ट्र कार्यालयात १ डिसेंबर २०१९ पासून ५३ वेळा कॉल केले. तो नेमका कोणाशी बोलत होता? त्याचा भाजपमधील हँडलर कोण?, २०१८ मध्ये भारतीय दूतावासाकडून आयोजित मॉरिशस भेटीदरम्यान एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप संदीपवर झाला. त्या प्रकरणाच्या चौकशीची सध्याची परिस्थिती काय? त्याला मोदी सरकार मदत करतंय का?, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीची निवड भाजपनं मोदींवरील बायोपिकची निर्मिती करण्यासाठी का केली?

त्याला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीदेखील पाठिंबा का दिला?, मोदींवरील बायोपिक करणाऱ्या संदीप सिंहच्या लिजंड ग्लोबल स्टुडियोसोबत गुजरात सरकारनं व्हायब्रंट गुजरात समीटमध्ये १७७ कोटींचा सामंजस्य करार केला. या करारासाठी केवळ संदीपच्या कंपनीची निवड का झाली? इतरांची का झाली नाही? संदीप भाजपचा इतका लाडका कशामुळे झाला?,  असे अनेक प्रश्न सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून भाजपला विचारले आहेत. सोबत देवेंद्र फडणवीस यांचा संदीप सिंह सोबतचा फोटोही ट्विट केला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा