अखिलेश यादव यांच्या वक्तव्याविरोधात भाजपाचं आंदोलन

 Azad Maidan
अखिलेश यादव यांच्या वक्तव्याविरोधात भाजपाचं आंदोलन
Azad Maidan, Mumbai  -  

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुजराती समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. अखिलेश यादव यांच्या वक्तव्याविरोधात भाजपाचे आमदार राज पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांनी 'सीमेवर लढण्यासाठी उत्तर प्रदेश, पंजाब आणि बिहारमधून लोकं सैन्यात जातात. हीच लोकं हुतात्मा होत असतात. गुजरातमधून कुणी का हुतात्मा होत नाही?' असा प्रश्न उपस्थित केला होता. 

अखिलेश यादव यांच्या याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीने आझाद मैदानात विरोध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अखिलेश यादव यांच्या वक्तव्यामुळे लोकांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गुजरातने महात्मा गांधींपासून नरेंद्र मोदींपर्यंत नेते या देशाला दिले आहेत. अखिलेश यादव यांचे वक्तव्य जातीयवाद वाढवणारे आहे. त्याचा निषेध करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया राज पुरोहित यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

Loading Comments