आमदार नितेश राणेंची पुन्हा गुंडगिरी?

 Dadar
आमदार नितेश राणेंची पुन्हा गुंडगिरी?

दादर - भाजपाचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश तेली याच्यावर दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर. 5 वर मंगळवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणी काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे यांच्याविरूद्ध कलम 337 504 323 120(b) 506(2) 34 अंतर्गत दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री कोकणकन्या ट्रेनच्या A 1 या बोगीत ही घटना घडली. कणकवलीला जाणाऱ्या कोकणकन्या ट्रेनमध्ये प्रथमेश चढत असताना दोन हल्लेखोरांनी त्याला खाली खेचलं. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याला चालत्या ट्रेनखाली ढकलण्याचा प्रयत्नही त्या हल्लेखोरांनी केला. मात्र प्रथमेशने आरडाओरडा केला आणि प्रवाशांनी गर्दी केली. मारहाणीत प्रथमेशच्या हाताला मार लागला आहे. हल्ला करुन पळ काढत असताना पोलिसांनी एकाला स्टेशनवरच पकडलं आणि दुसरा फरार झाला आहे. प्रवीण खरात असं पकडलेल्या हल्लेखोराचं नाव आहे. तो चेंबूरला राहतो. मारहाण झालेली सर्व दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. सीसीटिव्हीच्या आधारे दुसरा हल्लेखोरही लवकर सापडेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Loading Comments