Advertisement

गुजरातची कंपनीच मदतीला, रेमडेसिवीर इंजेक्शनवरून प्रविण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

भाजप नेत्यांनी पुढाकार घेत रेमडेसिवीर औषध बनवणाऱ्या दमण येथील एका कंपनीला सोमवारी भेट दिली.

गुजरातची कंपनीच मदतीला, रेमडेसिवीर इंजेक्शनवरून प्रविण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
SHARES

कोरोना विषाणूच्या (coronavirus) संसर्गावर परिणामकारक ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा निर्माण झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. एका बाजूला राज्य सरकार औषध कंपन्यांशी बाचतीच करत असताना दुसरीकडे भाजप नेत्यांनी पुढाकार घेत रेमडेसिवीर औषध बनवणाऱ्या दमण येथील एका कंपनीला सोमवारी भेट दिली. या भेटीनंतर महाराष्ट्राला भाजपकडून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येईल, असं आश्वासन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिलं. 

राज्यात (maharashtra) रेडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला असतानाच या इंजेक्शनचा साठा करून त्याचा काळाबाजारही जोरात सुरू असल्याचं निदर्शनास आलं होतं. पोलिसांनी छापेमारी करत या प्रकरणी काही जणांना अटकही केली आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने या तुटवड्याकडे पाहता रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता ते ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे,  रेमडेसिवीरसंदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढविणे यावर राज्य सरकार काम करत आहे.

हेही वाचा- गुढीपाडव्याला राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, 'असे' आहेत नियम

तर दुसरीकडे सोमवारी भाजप नेते प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी ब्रुक फार्मा प्रा. लि. या कंपनीशी चर्चा करण्यासाठी दमणला धाव घेतली. या चर्चेत कंपनीकडून सुरूवातीच्या टप्प्यात ८ ते १० हजार आणि एकूण ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळतील, असं आश्वासन दिलं. 

यासंदर्भात बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या पुढाकाराने भाजपकडून रेमडेसिवीरचा साठा महाराष्ट्र सरकारला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही परवानगी मिळताच रेमडेसिवीरचा पुरवठा केला जाईल, असं दरेकर यांनी सांगितलं.

हा पुढाकार उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या टीकेनंतर घेतला का? असा प्रश्न विचारला असता, राज्यातील जनतेसाठी भाजपने हा पुढाकार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी केंद्र-राज्य किंवा महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मतभेद करू नये, आज गुजरातमधील कंपनीच आपल्या मदतीसाठी पुढं येत आहे, हे महत्त्वाचं आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले. 

(bjp will provide 50 thousand remdesivir injection to maharashtra says pravin darekar)

हेही वाचा- कोकण हापूसच्या नावाने फसवणूक? राज्य सरकार करणार कारवाई


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा