Advertisement

अपात्र नगरसेवकांनी मुंबई महापालिकेचे ४० लाख थकवले

अपात्र ठरलेल्या मुंबई महापालिकेतील १२ नगरसेवकांनी वेतन आणि भत्त्यापोटी मिळालेली तब्बल ४० लाख रुपयांची रक्कम महापालिकेकडे परत जमा केली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

अपात्र नगरसेवकांनी मुंबई महापालिकेचे ४० लाख थकवले
SHARES

विविध कारणांनी अपात्र ठरलेल्या मुंबई महापालिकेतील १२ नगरसेवकांनी वेतन आणि भत्त्यापोटी मिळालेली तब्बल ४० लाख रुपयांची रक्कम महापालिकेकडे परत जमा केली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.  

बनावट जात प्रमाणपत्र, अवैध बांधकामे अशा विविध प्रकरणांत मुंबई महापालिकेच्या २४ नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. जोपर्यंत हे व्यक्ती नगरसेवक पदावर विराजमान होते, तोपर्यंत महापालिकेकडून त्यांना रितसर वेतन आणि इतर भत्ते देण्यात येत होते. अपात्र ठरल्यानंतर वेतन-भत्ते तात्काळ बंद करण्यात देखील आले. मात्र महापालिकेने अदा केलेली ही रक्कम परत घेण्यास मात्र अडचणी येत आहेत. 

अपात्र ठरलेल्या नगरसेवकांकडून महापालिकेच्या कायद्यानुसार वेतन आणि भत्त्याची रक्कम वसूल करण्यात आली आहे का, अशी विचारणा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रशासनाकडे केली होती. गलगली यांच्या अर्जावर महापालिकेकडून उत्तर देण्यात आलं आहे.

हेही वाचा- 'या' कारणामुळे काँग्रेसचं ट्विटर हँडल लाॅक!

त्यानुसार २४ अपात्र नगरसेवकांपैकी ३ नगरसेवकांना अपात्र ठरल्यानंतर महापालिकेकडून कोणतीही रक्कम देण्यात आलेली नाही. ९ नगरसेवकांनी तत्काळ दिलेली रक्कम परत केली आहे. तर, १२ नगरसेवकांनी ३९ लाख ९५ हजार ८३३ रुपयांची रक्कम परत दिलेली नाही. यापैकी शिवसेनेचे ३, भाजप ३, काँग्रेसचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि अपक्ष २ अशा १२ नगरसेवकांचा समावेश आहे. अपात्र ठरल्यानंतर वसुलीसाठी महापालिकेच्या चिटणीस विभागाने या सर्वांना पत्रं पाठवली आहेत.

ज्या अपात्र नगरसेवकांनी महापालिकेची रक्कम परत केलेली नाही, त्यांच्या मालमत्तेवर टाच आणून रक्कम वसूल करावी, अशी मागणी अनिल गलगली यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून केली आहे.  

कोणी किती रक्कम थकवली?

- मुरजी पटेल, भाजप : ५.६४ लाख रुपये

- केशरबेन पटेल, भाजप : ५.६४ लाख रुपये

- भावना जोबनपुत्रा, भाजप : ३.४९ लाख रुपये

- राजपती यादव, काँग्रेस : ५.६४ लाख रुपये

- किणी मॉरेस, काँग्रेस : ४.८४ लाख रुपये

- भारती धोंगडे, काँग्रेस : १.८१ लाख रुपये

- सगुण नाईक, शिवसेना : ३.५५ लाख रुपये

- अनुषा कोडम, शिवसेना : ३७ हजार रुपये

- सुनील चव्हाण, शिवसेना : ९३ हजार रुपये

- नाजीया सोफी, राष्ट्रवादी : ७.२१ लाख रुपये

- चंगेझ मुलतानी, अपक्ष : ७९ हजार रुपये

- अंजुम अस्लम अपक्ष : ४५ हजार रुपये

हेही वाचा- ओबीसींचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणार- उद्धव ठाकरे


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा