सट्टेबाजाराचं मत शिवसेनेच्या पारड्यात

  मुंबई  -  

  मुंबई - निवडणुकांचा हंगाम म्हटलं की दावे-प्रतिदावे आलेच. कुणी शतप्रतिशतचा करतो तर कुणी स्वबळाचा.पण, राजकीय पक्षांसोबतच या काळात सक्रिय होतो तो सट्टाबाजार. शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे यंदाची पालिका निवडणूक चुरशीची झाली आहे. राजकीय पक्षांनी कितीही दावे केले तरी सट्टा बाजाराने मात्र पहिली पसंती शिवसेनेला दिली आहे.

  बुकींच्या अंदाजाने शिवसेनेला यंदा 65 ते 85 तर भाजपला 60 ते 80 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 20 ते 40 च्या दरम्यान जागा मिळतील. विशेष म्हणजे मनसेलाही बुकींनी नाराज केलेलं नाही. मनसेला पाच ते 9 जागा मिळण्याचा अंदाज बुकींनी व्यक्त केला आहे. या सर्व आकडेमोडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मात्र कुठेच नाही. शिवाय व्होटबँकेच्या राजकारणात वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून देणाऱ्या एमआयएम आणि समाजवादी पक्षाकडेही सट्टा बाजाराने दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय.

  सट्टा हा बेभरवशाचा खेळ मानला जातो. पण,  हे सगळे निकाल बुकी अभ्यास करूनच देत असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय. मोदीसरकाराच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सट्टा बाजारात थोडी मंदी आहे यात शंकाच नाही मात्र सध्याच्या तापलेल्या वातावरणाने मतदानांपर्यंत सट्टा काहीशे कोटींपर्यंत जाईल असा विश्वास सट्टेखोरांना आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.