राम मंदिराचा मुद्दा उचलून सत्तेत आलेल्यांची इच्छा असेल तर राम मंदिर बनू शकतं, असं म्हणत राम मंदिरासाठी केंद्राने विधेयक आणावं, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. राऊत यांनी शुक्रवारी अयोध्येत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी केली. राम मंदिरासंबंधीचा कायदा बनवा त्याला शिवसेनाच काय सर्वच पक्ष पाठिंबा देतील, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. पहले मंदिर फिर सरकार, असा नाराही त्यांनी यावेळी दिला.
राम मंदिराचा मुद्दा हाती घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २४ आणि २५ नोव्हेंबरला अयोध्येचा दौरा करणार आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्याला काही तासच उरले असून या दौऱ्याची जय्यत तयारी शिवसेनेच्या नेत्यांकडून सुरू आहे. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि नेते अयोध्येत पोहोचले अाहेत. शुक्रवारी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरही विमानाने अयोध्येला रवाना झाले आहेत.
शिवसेनेकडून अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार असून उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. व्यापाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवले जाणार आहेत. एकूणच अयोध्येत सध्या उत्साह आणि तणाव असं दोन्ही प्रकारचं वातावरण पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर राऊत यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारने राम मंदिर उभारणीसाठी अध्यादेश आणवा, अशी मागणी केली. भाजपा गेल्या २५ वर्षांपासून राम मंदिर उभारणीचा मुद्दा उचलत आहे. सरकार स्थापनेची संधी द्या आम्ही मंदिर बनवू असं म्हणत २०१४ मध्ये भाजपा सरकार बहुमतानं सत्तेत आलं. तरीही गेल्या ४ वर्षांत त्यांनी काहीच केलं नाही. असं असताना भाजपाने पुन्हा हाच मुद्दा घेऊन २०१९ च्या निवडणुकीला सामोरं जाणं हे शिवसेनेला मंजूर नाही. म्हणूनच आधी मंदिर मग सरकार, अशी हाक उद्धव ठाकरे यांनी दिल्याचंही राऊत यांनी सांगितलं.
राम मंदिराचा मुद्दा न्यायालयात सुटणारा नाही. इच्छा असेल तर पंतप्रधान मोदी राम मंदिर उभारण्यासाठी निर्णय घेऊ शकतात. त्यासाठी कायदा तयार करण्याची आणि विधेयक आणण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं त्वरीत विधेयक आणावं, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी परवानगी मागितलीच नसल्याचं म्हणत राऊत यांनी अयोध्या दौरा नक्कीच राम मंदिर उभारण्याचीदृष्टीनं महत्त्वाचा ठरणार असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा-
रामाच्या नावे आणखी किती निवडणुका लढवणार - उद्धव ठाकरे
आधी शिवनेरी, मग अयोध्या, उद्धव ठाकरे गडावरील माती कलशात भरून नेणार