तुरुंगातल्या भुजबळांची सोहळ्याला प्रमुख उपस्थिती?

 Mumbai
तुरुंगातल्या भुजबळांची सोहळ्याला प्रमुख उपस्थिती?

मुंबई -  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सध्या कुठे असतील? असा प्रश्न कुणाला विचारला तर ते तुरुंगात असं उत्तर सध्यातरी मिळेल. जर छगन भुजबळ एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर. थोडं आश्चर्य वाटेल ना? पण छगन भुजबळ नाशिकमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हे आम्ही नाही सांगत तर आदिवासी मंत्रालयातली ही निमंत्रण पत्रिकाच सांगतेय. 

आता तुमच्या डोक्यात विचार आला असेल की सध्या छगन भुजबळ तर मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तुरुंगात असताना कसं काय हे शक्य आहे? पण ही निमंत्रणपत्रिका पाहिल्यावर तुम्हाला पटेल की कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना चक्क राज्य सरकारकडून आलं आहे. आदिवासी विकास विभागाकडून छापण्यात आलेल्या एका पत्रिकेत प्रमुख उपस्थिती दर्शवणाऱ्या निमंत्रितांच्या यादीत छगन भुजबळ यांचे नाव टाकण्यात आले आहे. 

27 मार्चला नाशिकमध्ये महाकवी कालिदास कलामंदिरात सकाळी 11 वाजता आदिवासी विकास विभागाकडून आदीवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आहे. याच कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत प्रमुख उपस्थितांमध्ये  छगन भुजबळ यांचे देखील नाव आहे. त्यामुळे आता तुरुंगात असलेले छगन भुजबळ कसे काय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार? याचं उत्तर राज्य आदीवासी विभागाने शोधावं?

Loading Comments