भुजबळांनी पाठवली दमानियांना अब्रुनुकसानीची नोटीस

 Mumbai
भुजबळांनी पाठवली दमानियांना अब्रुनुकसानीची नोटीस

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि अंजली दमानिया यांच्यामधील वाद विकोपाला पोहोचला आहे. खोट्या आरोपांद्वारे बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानिया यांना छगन भुजबळ यांनी गुरूवारी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

छगन भुजबळ यांची बदनामी केल्याबद्दल 48 तासांमध्ये माफी मागावी, अन्यथा अंजली दमानिया यांच्या विरोधात 50 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा केला जाईल, अशा आशयाची ही नोटीस आहे.

आर्थर रोड जेलमध्ये भुजबळ यांना पंचतारांकित सुविधा मिळत आहेत. तेथे त्यांना खास टीव्ही, चिकन मसाला, दर दोन तासांनी फळे आणि सकाळ, संध्याकाळी तीन तास मोबाइलवर बोलण्याची सुविधा दिली जाते. असा दावा काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. 
बुधवारी छगन भुजबळ यांनी याबाबत खुलासा करत दमानिया यांना कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार गुरुवारी छगन भुजबळ यांनी दमानिया यांना मंगेश बनसोड या वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे.

Loading Comments