Advertisement

तर हा संभाजी महाराज आडवा येईल.., मराठा आरक्षणावर आक्रमक

मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा कोणी प्रयत्न केला, तर त्याला हा संभाजी महाराज आडवा येईल, असा इशारा भाजप खासदार छत्रपती संभाजी यांनी दिला.

तर हा संभाजी महाराज आडवा येईल.., मराठा आरक्षणावर आक्रमक
SHARES

छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मला कोणी आंदोलन कसं करायचं हे शिकवण्याची गरज नाही. मी जे बोलतो ते करुन दाखवतो. एकदा पाय टाकला तर माघार नाही आणि मी हे करुन दाखवलेलं आहे, असं सांगतानाच मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा कोणी प्रयत्न केला, तर त्याला हा संभाजी महाराज आडवा येईल, असा इशारा भाजप खासदार छत्रपती संभाजी यांनी दिला.

मराठा आरक्षण प्रश्नावर संभाजी महाराज शांत असल्याचा आरोप सातत्याने काही गटांकडून करण्यात येत आहे. त्याला संभाजीराजेंनी अत्यंत आक्रमक भाषेत उत्तर दिलं. ते नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मी जेव्हा काही बोलतो तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांची भूमिका तसंच मराठा समाजाची भूमिका या नात्याने बोलत असतो. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मराठा समाजाविराेधात आल्यानंतर विरोधी पक्षातील नेते राज्य सरकारवर, तर सत्ताधारी विरोधकांवर आरोप करायला लागले आहेत. एकमेकांवर जबाबदारी झटकण्याचं काम सुरू आहे. कोण म्हणतंय ही राज्याची जबाबदारी आहे, तर कोण म्हणतंय ही केंद्राची जबाबदारी आहे. मराठा समाजाला त्याचं काहीही देणंघेणं नसून, यातून तुम्ही मार्ग काय काढणार आहात, यावरचं सोल्युशन काय? हेच समाजाला हवं आहे. 

याप्रश्नी मी जी काही संमजसपणाची भूमिका घेतली, त्यावर काहीजण लगेच टीमटीम करायला लागले. जे माझ्या भूमिकेवर शंका करत होते. माणसं जगले तर आरक्षणासाठी आपण लढा देऊ शकतो. त्यामुळे छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मला आंदोलन काय आहे, हे शिकवण्याची गरज नाही. मी जे बोलतो ते करून दाखवतो. २००७ पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय. भव्य राजवाडा असताना देखील तिथं मी महिन्यातील चार दिवसच राहतो. समाजाला दिशा देण्यासाठी, त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी रान पिंजून काढलंय. 

हेही वाचा- मराठा आरक्षण: नोकरभरतीचा निर्णय अहवालानंतरच

२०१४ ला मराठा समाजातील सगळे लोकं एकत्र आले. त्यावेळी मला म्हणाले की तुमच्या नेतृत्वाखाली आपण आझाद मैदानात जाऊ. त्यावेळी बोलणारे लोकं कुठं आहेत आता? होय यावेळेला निश्चितच मी शांत आहे. शिवाजी महाराजांनी देखील आपली माणसं मरू नये म्हणून अनेकदा तह केलेला आहे. राजर्षी शाहू महारांजानी प्लेगच्या साथीत लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: पहिल्यांदा लस घेतली होती. मी निश्चितच आक्रमक होईन, पण माझा सगळ्या पक्षांना प्रश्न आहे की मराठा आरक्षणावर तोडगा काय हे आधी सांगावं.

माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेक तज्ज्ञ आहेत. त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र फिरुन पुन्हा एकदा भावना समजून घेणार आहे. येत्या २७ तारखेला मुंबईत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका मांडणार. पण यानिमित्ताने मला सर्व आमदार आणि खासदारांना सांगायचं आहे की, ही जबाबदारी राज्याची आहे की केंद्राची हे आपण ठरवू, पण समाजाची भावना मांडल्यानंतर माझं तुझं केलं तर बघा, असा इशाराच संभाजीराजेंनी दिला आहे. 

मी समाजाचं नेतृत्व करत नाही, तर त्याला दिशा देण्याचा आणि भूमिका मांडण्याचा प्रयत्न मी करतोय. पण समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कुणी केल्यास त्याला हा संभाजी महाराज आडवा येईल, असा दम देखील संभाजीराजेंनी दिला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा