Advertisement

मराठा तरूणांच्या नियुक्त्या का थांबवल्या, संभाजीराजेंच्या मुख्यमंत्र्यांना सवाल

निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हातात असतानाही मराठा तरूणांच्या नोकऱ्या का अडवून ठेवण्यात आल्या आहेत? असा संतप्त सवाल संभाजीराजेंनी केला.

मराठा तरूणांच्या नियुक्त्या का थांबवल्या, संभाजीराजेंच्या मुख्यमंत्र्यांना सवाल
SHARES

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाविरोधात निकाल दिलेला असला तरी ९ सप्टेंबर २०२० च्या आधीच्या ज्या नियुक्त्या असतील, त्यांना आडकाठी केलेली नाही. असं असताना त्यांना नोकऱ्या का दिल्या जात नाहीत, असा सवाल भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चांगलेच आक्रमक झाले. काही गटांकडून संभाजीराजे शांत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांना उत्तर देताना ते म्हणाले की, मला आंदोलन कसं करायचं हे कुणी शिकवू नये. आक्रमक व्हायला मला २ मिनिटं देखील लागणार नाही. रस्त्यावर उतरून जर आरक्षणाचा प्रश्न सुटत असेल, तर उद्या देखील उतरायला तयार आहे. २०१८ साली मुंबईतील मराठा आंदोलनात स्टेजवर जाण्यास कुणाचं धाडस होत नव्हतं. पण मी गेलो स्टेजवर. माझं ऐकून मराठा समाजा परत गेला. तिथं जर काही वाद झाला असता, हिंदू-मुस्लिम, दलित-मराठा, ओबीसी-मराठा दंगल झाली असती, तर त्याला कुणी उत्तर दिलं असतं? आज बोलणारे ते नेते कुठं गेले, असा प्रश्न त्यांनी केला.

हेही वाचा- तर हा संभाजी महाराज आडवा येईल.., मराठा आरक्षणावर आक्रमक

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं असताना आणि हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हातात असतानाही मराठा तरूणांच्या नोकऱ्या का अडवून ठेवण्यात आल्या आहेत? असा संतप्त सवाल संभाजीराजेंनी केला. ‘सारथी’साठी मी आंदोलन केलं, रस्त्यावर उतरलो, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटलो. शाहू महाराजांच्या नावाने उभी केलेल्या सारथी संस्थेने गेल्या दीड वर्षात काय केलं? पैसे दिल्याचं फक्त म्हणतात. मग कशाला हवंय त्यांचं नाव काढून टाका. बहुजन समाजाची भूमिका समजणारा एक तरी जाणकार व्यक्ती आहे का त्यात? जे हातात आहे ते कराना तुम्ही, असं आव्हान संभाजीराजेंनी सरकारला दिलं.

येत्या २७  मे रोजी मी मराठा समाजाची भूमिका मांडणार आहे. तेव्हा कुठल्या आमदार, खासदाराने माघार घेतली, तर समाजाशी तुमचं काही देणं घेणं नाही. मी २७ तारखेपर्यंत महाराष्ट्रात ठिकठिकाणी भेट देऊन लोकांशी चर्चा करणार आहे. मी एकटाच काही हुशार नाही, मराठा समाजासाठी त्याग देणारे अनेक तज्ज्ञ आहेत. लोकांच्या भावना मी समजून घेणार आहे. कोविडच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करणं, मोर्चे काढणं चुकीचं आहे. ही मोठी लढाई आहे, लोकं मरत आहेत, यातून आपल्याला आधी बाहेर यावं लागेल. माझं सर्वपक्षीय नेत्यांना हेच आवाहन आहे की तुम्हाला काय करायचं ते करा, पण तुम्ही मराठा समाजाला आरक्षण कसं मिळवून देता येईल, यावर उपाय आधी सांगा, असं संभाजीराजे म्हणाले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा