गोटेंनी पुन्हा असे मत मांडू नये - मुख्यमंत्री

 Vidhan Bhavan
गोटेंनी पुन्हा असे मत मांडू नये - मुख्यमंत्री
गोटेंनी पुन्हा असे मत मांडू नये - मुख्यमंत्री
See all

मुंबई - 'अनिल गोटे यांनी जे मत विधान सभेत आणि प्रसारमाध्यमांमध्ये मांडलं आहे. ते पूर्णपणे चुकीचं आहे. मुख्यमंत्री आणि व्यक्तिगत म्हणून मी या विचारांशी सहमत नाही. अनिल गोटे यांना बोलावून यापुढे असे मत मांडू नये असे निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.विधान परिषदेमधील विरोधीपक्ष आमदारांच्या कोंडीमुळे भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी चक्क विधान परिषद बरखास्त करावी अशी मागणी केली होती. यासाठी भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विधान परिषद बरखास्त करण्याची मागणी केली होती. याबाबत विधान परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी विरोध केला होता. विधान परिषदेचा अपमान करण्यात आल्याचा आरोप आमदारांनी केला होता. 

काय म्हणाले होते अनिल गोटे - 

'देशातील केवळ 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. विधान परिषदेला घटनात्मक अधिकार नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांना मतदारांनी नाकारले असे प्रतिनिधी विधानपरिषदेत येतात. विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह न राहता अशा असंतुष्ट राजकारण्यांचा अड्डा बनला आहे. समाजातून विधान परिषदेमध्ये ग. दि. माडगुळकर, वसंत बापट, ना. धों. महानोर, मा. गो. वैद्य, वंसत देसाई या विद्वानांनी विधान परिषदेमध्ये मार्गदर्शन केले आहे. मात्र भूतकाळातील आदर्श पूर्णपणे संपुष्टात आला आहे. शासनाची कोंडी करणे, निवडणुकीतला वचपा विधान परिषदेत काढणे यासाठी विधान परिषदेचा वापर केला जातो. राज्य सरकारला स्थानिक विकास निधी, पगार, भत्ते, मोफत प्रवास, मोफत आरोग्य सेवा, विकास निधी यावर प्रतिवर्षी 300 कोटी खर्च होतो. यामुळे वायफळ खर्च बंद करून विधानपरिषद बंद करावी' अशी मागणी त्यांनी केली आहे.

Loading Comments