Advertisement

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

''आम्ही २५ वर्षे साप पाळला, आता तो आमच्यावर फूत्कारतोय, पण त्याला कसे ठेचायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे'', अशा कणखर शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
SHARES

शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची सत्ता राज्यात आल्यापासून विरोधी पक्ष भाजपा चांगलाच आक्रमक झाला. सत्तास्थापनेच्या पहिल्या दिवसापासून भाजपा महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहे. अशातच मागील काही दिवसांपासून शिवसेना व भाजपाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. ''आम्ही २५ वर्षे साप पाळला, आता तो आमच्यावर फूत्कारतोय, पण त्याला कसे ठेचायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे'', अशा कणखर शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

''हिंमत असेल तर आमचे सरकार पाडून दाखवाच'', असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं. महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार यांचे स्नेहभोजन आणि बैठक अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक निवासस्थानी बुधवारी झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

''आज सरकार पाडतो, उद्या सरकार पाडतो, असे काही जण म्हणताहेत. आमचे सरकार मजबूत आहे. १७० आमदार हे आमचे मोहरे आहेत. एकही जण कुठे जाणार नाही. आम्ही २५ वर्षे पाळलेले सापाचे पिल्लू आता वळवळ करत आहे. ईडीच्या धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही धमक्यांना घाबरत नाही. दाऊदशी आमच्या लोकांचा संबंध जोडता. हिंमत असेल तर दाऊदला पकडून दाखवा. आम्हाला उगाच त्रास द्याल तर ते खपवून घेणार नाही'', असे मुख्यमंत्री म्हणाले.

एवढ्या सूडबुद्धीने विरोधकांशी वागणारे सरकार आपण यापूर्वी पाहिले नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले. माझे सरकार एकेकाळी केंद्राने बरखास्त केले होते, पण अशी कटुता आमच्यात आलेली नव्हती. नवाब मलिक यांच्यावरील कारवाईनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्याला फोन केला. मंत्र्यांचा राजीनामा घेऊ नका. भाजपशी लढून त्यांना हरविता येते. तिन्ही पक्ष मजबुतीने उभे राहायला हवेत, असे त्या म्हणाल्या. राज्यातील सरकार मजबूत आहे आणि राहील, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा