Advertisement

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आक्रमक; 'आता दया, माया, क्षमा दाखवता येणार नाही


फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आक्रमक; 'आता दया, माया, क्षमा दाखवता येणार नाही
SHARES

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांना फोन करून त्यांच्यापाठीमागे सरकार खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 'तुमच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा होईल. ते आमच्यावर सोडा. त्याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा', असा शब्द ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांना दिला. त्यानंतर याप्रकरणी आता उद्धव ठाकरे यांनी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत, 'येत्या काळात आपल्याला कठोरपणे कायदा राबवावा लागेल. तिथे दया, माया, क्षमा दाखवता येणार नाही', असं म्हटलं.

'मधल्या काळात जी काही घटना घडली ठाण्यामध्ये त्यामुळे येत्या काळात आपल्याला कठोरपणे कायदा राबवावा लागेल. तिथे दया, माया, क्षमा दाखवता येणार नाही. नागरिक, माता भगिनी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आपल्यावर आहे. त्याबाबतीत कुठेही हयगय चालणार नाही. स्कायवॉकच नव्हे तर इतर ठिकाणी जर फेरीवाल्यांचा उच्छाद असेल. तो उच्छाद आपल्याला आटोक्यात आणावाच लागेल. त्या दिशेने काम हे आपल्याला करावं लागेल', असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध उपक्रमांचं लोकार्पण सोहळा मंगळवारी पार पडला. डोबिंवली पूर्व पश्चिमला जोडणारा कोपर उड्डाणपुलाचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. गेली २ वर्षे हा जुना पूल बंद होता. नंतर तोडून नव्याने बांधण्यात आला. हा पूल नसल्याने पूर्व पश्चिम प्रवास करायला ठाकुर्लीच्या उड्डाणपुलावरून वळसा घालायला लागयचा. या पुलामुळे हा वेळ वाचणार आहे. हा पूल १ वर्षे आणि ४ महिन्यात पूर्ण झाला आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी शिवसेना भाजपा नेत्यांचा कलगीतुरा पाहायला मिळाला. भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांना कानपिचक्या दिल्या. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , खासदार श्रीकांत शिंदे, भाजपा आमदार रविंद्र फाटक, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेरीवाल्यांचा मुद्दा अधोरेखित केला आणि येत्या काळात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

'आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. यासाठी जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. धार्मिक स्थळं उघडली पाहीजेत, हरकत नाही. कपिल पाटीलजी तुमच्याकडे आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे ना, कि त्याच्या बाजूला मी मंदिरं उघडू. आरोग्य केंद्र बंद करून. आज आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरं ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने जाणार आहोत. आपण घोषणा देताना भारत माता की जय, वंदे मातरम द्यायला चांगल्या आहेत. आम्हीही त्या घोषणा दिलेल्या आहेत. घोषणेच्या पुढे जात आम्ही हिंदुत्वाचं रक्षण केलेलं आहे. हे ९२-९३ साली दाखवून दिलेलं आहे', असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा