युती होण्यापूर्वीच भाजपा उमेदवारांची प्रचाराला सुरुवात

 Pali Hill
युती होण्यापूर्वीच भाजपा उमेदवारांची प्रचाराला सुरुवात

मुंबई - महापालिका निवडणुकीत शिवसेना - भाजपा युतीची चर्चा सुरु असून अद्यापही ना दोन्ही पक्षांकडून युतीची बोलणी अंतिम झाली ना जागांचं वाटप झालं. मात्र, तरीही भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपाच्या इच्छुक उमेदवार शीतल गंभीर -देसाई आणि धारावीतील प्रभाग क्रमांक 189 मधील प्रोफेसर शामल सुरेश गंभीर यांनी आपली उमेदवारी जाहीर होण्याआधीच घरोघरी फिरून प्रचाराला सुरुवात केली आहे. माहीम भागातील शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांनी मागील काही दिवसांमध्ये भाजपात प्रवेश केला आहे. गंभीर यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपाने एक प्रकारे सेनेला चांगलाच दणका दिलाय. मात्र, भाजपात प्रवेश केल्यानंतर गंभीर यांनी आपल्या दोन्ही मुलींना राजकारणात आणून थेट आगामी महापालिका निवडणुकीत रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

माहीम-दादर विधानसभा क्षेत्रात आजवर भाजपाने कधीच जागा लढवलेली नसून येथील प्रभाग क्रमांक 190 या महिलांसाठी आरक्षित प्रभागात गंभीर यांच्या कन्या शीतल गंभीर-देसाई या इच्छुक आहेत. धारावीतील प्रभाग क्रमांक 189 या (धारावी लेबर कॅम्प- शाहूनगर कमला रामननगर, आझाद नगर ) प्रभागातून गंभीर यांची दुसरी कन्या प्रोफेसर शामल सुरेश गंभीर या इच्छुक आहेत. या दोघींनीही आपापल्या भागात प्रचाराला सुरुवात केली असून भाजपाची पत्रकं वाटून घरोघरी जाऊन भेटी घेत आहेत. या दोघीनींही राज्यातील भाजपा सरकारने केलेल्या विकास कामांचा समावेश करून प्रचाराला सुरुवात केली आहे.

भाजपाला विशाखा राऊत यांच्या उमेदवारीने मिरच्या का झोंबाव्यात

शिवसेनेच्यावतीने दादर मधील प्रभाग क्रमांक 191 मधून विशाखा राऊत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे भाजपाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आणि त्यांनी भाजपाच्या वतीने या प्रभागातून किरीट सोमय्या यांच्या पत्नीची उमेदवारी जाहीर केली. युतीची घोषणा अद्याप झालेली नसताना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे भाजपाने ही मेधा सोमय्या यांचं नाव पुढे रेटलं. परंतु एका बाजूला शिवसेनेच्या उमेदवारांची अप्रत्यक्ष नावेच जाहीर करण्यात आल्यामुळे भाजपाला मिरच्या झोंबल्या. पण, दुसरीकडे युतीची घोषणा झालेली नसताना तसंच प्रभागाचं वाटप झालेलं नसताना सेनेतून भाजपात गेलेले माजी आमदार सुरेश गंभीर यांनी आपल्या दोन्ही मुलींना पक्षाकडून तिकीट निश्चित करून घेत माहीम आणि धारावी विधानसभेतील मतदार संघातील अनुक्रमे प्रभाग क्रमांक 190 आणि 189 मधून उमेदवारी मिळाल्याप्रमाणे घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली आहे.

Loading Comments