अंधेरी पश्चिम विभाग झाला काँग्रेसमुक्त

  Andheri
  अंधेरी पश्चिम विभाग झाला काँग्रेसमुक्त
  मुंबई  -  

  देशभरात काँग्रेसमुक्तीचा नारा देत निवडणूक लढवणाऱ्या भाजपाने मुंबईतील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अंधेरी पश्चिमचा भागही आता काँग्रेसमुक्त केला आहे. जयवंत परब, माजी विरोधी पक्षनेता देवेंद्र आंबेरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता माजी नगरसेविका जोत्स्ना दिघे यांनीही भाजपात प्रवेश करत कमळ हाती घेतले आहे. काँग्रेसचे माजी आमदार बलदेव खोसा यांच्या मराठी द्वेष्टेपणाला कंटाळून या सर्वांनी काँग्रेसला रामराम केला असून, अजूनही या भागातील काँग्रेसचे पदाधिकारी भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

  एकेकाळी अंधेरी पश्चिम भागात काँग्रेसचे प्राबल्य असायचे. सरासरी 5 ते 6 काँग्रेसचे नगरसेवक या प्रभागातून निवडून यायचे. परंतु सध्या मोहसीन हैदर यांची पत्नी मेहर हैदर ही एकमेव काँग्रेसची नगरसेविका निवडून आली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी अंधेरी आणि वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयवंत परब यांच्यापाठोपाठ माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता प्रभाग क्रमांक 60 मधून पराभूत झालेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका जोत्स्ना दिघे यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. आंबेरकर आणि दिघे हे काँग्रेसचे हक्काचे निवडून येणारे नगरसेवक होते. परंतु त्यांनीच काँग्रेसला रामराम केल्यानंतर या भागात माजी आमदार अशोक जाधव आणि बलदेव खोसा हे दोनच नेते उरले आहेत.

  जोत्स्ना दिघे या सलग तीन वेळा निवडून आल्या होत्या. परंतु चौथ्यांदा महापालिका निवडणुकीत भाजपाच्या नवख्या उमेदवाराकडून पराभूत झाल्या. प्रभाग क्रमांक 60 या प्रभागात माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे आणि जोत्स्ना दिघे यांच्यात प्रमुख लढत होती. परंतु शेवटच्या क्षणाला भाजपाचे उमेदवार योगीराज दाभाडकर हे निवडून आले. आता त्याच पराभूत उमेदवाराला भाजपाने पक्षात प्रवेश दिला आहे. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मते बलदेव खोसा यांच्यामुळेच पक्षात फूट पडली आहे. याचाच फायदा भाजपाकडून उठवला जात आहे. आंबेरकर यांचा पत्ता खोसा यांनी कापल्यामुळेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. माजी नगरसेविका वनिता मारुचा आणि माजी नगरसेवक मोहसीन हैदर हे काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी राहिले असले तरी मोहसीन हैदरशिवाय काँग्रेसचा प्रभाव असलेला नेता आणि पदाधिकारी अंधेरी पश्चिम भागात उरलेला नसल्यामुळे आगामी काळात काँग्रेसला पुन्हा जिवंत करणे फारच कठीण असल्याचे काँग्रसेच्या काही माजी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.