3 वर्षात भाजपाची फक्त आश्वासने - आर. पी. सिंह

  Mumbai
  3 वर्षात भाजपाची फक्त आश्वासने - आर. पी. सिंह
  मुंबई  -  

  मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने कार्यक्रम चालू आहेत आणि दुसरीकडे सामान्यांचे हाल सुरू आहेत, असं म्हणत माजी केंद्रीय मंत्री आर. पी. सिंह यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. दरवर्षी 2 करोड नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. मात्र प्रत्यक्षात 14 लाख नोकऱ्याही उपलब्ध झाल्या नसल्याचा दावा त्यांनी शुक्रवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

  भाजपा सरकारने नागरिकांना केवळ आश्वासने दिली असून, ठोस कामे केलेली नाहीत. केंद्रातील भाजपा सरकारच्या काळात देशातील कायदा आणि सुव्यवस्था ढिसाळ झाली आहे. नोटबंदी आणि कॅशलेस निर्णयामुळे देशातील कोट्यवधी लोकांची आर्थिक कोंडी झाली आहे. सीमेवर 1 हजारपेक्षा जास्त गोळीबार झाला असून, शेकडो जवान हुतात्मा झाल्याचे म्हणत त्यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला.

  काँग्रेसच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग पाकिस्तानला गेले नाहीत. मात्र मोदी जाऊन आल्यानंतर भारतावर किती हल्ले झाले हे आपण पाहत असालच, असे म्हणत त्यांनी मोदींच्या पाक दौऱ्यावरही तोंडसुख घेतले.

  आमची सत्ता असताना दाऊदला भारतात आणण्याचे प्रयत्न केले गेले. भाजपा सरकारमधील काही नेते दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नाला हजेरी लावत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. मुंबईत नोकऱ्या नाहीत, शेतकरी आत्महत्या करत आहेत, तेलावर पैसे वाढवून 4.50 लाख करोड रूपयांचा फायदा सरकारने करून घेतला आहे. भाजपाच्या विरोधात कुणी आवाज उठवला तर त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडत आहेत. युपी, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यात महिला आणि दलितांवर हल्ले होत आहेत. मात्र, यावर भाजपा सरकार गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.