शिवसेनेला सत्तेचीच लालसा - सचिन पायलट

 Mumbai
शिवसेनेला सत्तेचीच लालसा - सचिन पायलट
Mumbai  -  

शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत असून, त्यांना सत्तेचीच लालसा आहे. ते फक्त पोकळ धमक्याच देत असल्याची टीका काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी शुक्रवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. गेल्या अाठवड्यापासून नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रमांचे अायोजन केले जात अाहे. मोदींनी निवडणूक प्रचारामध्ये 3 वर्षांपूर्वी जी आश्वासने दिली होती. ती अद्याप पूर्ण केलेली नाहीत आणि याचे मोदींना काहीच वाटत नसल्याचे म्हणत पायलट यांनी मोदी सरकारच्या कामगिरीवर तोंडसुख घेतले. 

सरकारच्या विरोधात जर कोणी बोलले, तर त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. आमच्या काळात आम्ही देशात अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांची निर्मिती केली. मागील वर्षात दोन कोटी रोजगारांची निर्मिती व्हायला हवी होती. पण 10 लाख रोजगारांची तरी निर्मिती झाली का? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबरोबर देशातल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. पंतप्रधान याबाबत काहीही बोलत नाहीत. राज्यात शेतकर्‍यांनी बंद जाहीर केला अाहे. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत अाहे. त्यांच्या मागण्यांना न्याय दिला पाहिजे. केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार असताना उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी होते. मग महाराष्ट्रासाठी का भेदभाव केला जातो? शासनाने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत अापली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. 

सचिन पायलट, काँग्रेस नेते

यावेळी बोलताना सचिन पायलट यांनी भाजपा सरकारच्या काश्मिर प्रश्नाविषयीच्या भूमिकेवरही टीका केली. काश्मिरमध्ये काही ठिकाणी लोक पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरत आहेत. राहुल गांधी मध्यप्रदेश येथील मृतांच्या वारसांना भेटायला गेले असता त्यांना अटक करण्यात आली. भारतातील महत्वाच्या विद्यापीठांमध्ये सरकारचा हस्तक्षेप होत आहे. भारतात अॅट्रॉसिटी अॅक्टचे प्रमाण, महिलांवरील अत्याचार आणि अल्पसंख्याक यांच्यावर हल्ले होत आहेत. भाजपा सरकार यासाठी काही करत नाही. भाजपा सरकार काँग्रेसच्या सर्व स्किम स्वतःच्या नावावर खपवत आहे. जर भाजपा सरकारने पाकिस्तानविरोधात पाऊल उचलले तर काँग्रेस पूर्ण पाठिंबा देईल, असेही सचिन पायलट यावेळी म्हणाले.


Loading Comments