मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये योग अनिवार्य करण्यावरून काँग्रेसच्या कोलांटउड्या सुरू आहेत. पालिका शाळांत योगा व सूर्य नमस्कार करण्यास सक्ती नको ऐच्छिक करा, अशी पालिका सभागृहात भूमिका मांडणारे काँग्रेस नेते आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सोमवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात योगा व सूर्यनमस्कार याला विरोध नाही, मात्र पालिका शाळांत सक्ती नको असे म्हटले आहे.
अनेक धर्म, पंथ, भाषा असलेल्या आपल्या देशात योग व सूर्यनमस्कार सक्तीचे केल्यास घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते, असे छेडा यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, सपा या प्रस्तावाविरोधात अजूनही आक्रमक असून त्यांनीही प्रस्तावाची अंमलबजावणी करू नये यासाठी सपापनेही तीन दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांची भेट घेऊन याची अमलबजावणी होऊ नये यासाठी निवेदन सादर केले. योग सक्तीच्या विरोधात सपा आक्रमक असताना ऐच्छिक असावा अशी भूमिका घेणा-या काँग्रेसने आता ऐच्छिक ही भूमिका बदलून सक्ती नको या सपाच्या भूमिकेत सूर मिसळला.