Advertisement

कष्टकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ७५०० रुपये टाका, अशोक चव्हाणांची केंद्राकडे मागणी

पंतप्रधानांच्या या घोषणेला लक्ष्य करताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देशातील प्रत्येक कष्टकऱ्याच्या बँक अकाऊंटमध्ये किमान ७५०० रुपये जमा करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.

कष्टकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ७५०० रुपये टाका, अशोक चव्हाणांची केंद्राकडे मागणी
SHARES

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून केलेल्या भाषणात स्वावलंबन योजनेअंतर्गत २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधानांच्या या घोषणेला लक्ष्य करताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देशातील प्रत्येक कष्टकऱ्याच्या बँक अकाऊंटमध्ये किमान ७५०० रुपये जमा करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. 

साखळी मजबूत करण्यासाठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक पॅकेजवर भाष्य करताना अशोक चव्हाण म्हणाले, आत्मनिर्भर भारतासाठी मागणी व पुरवठ्याची साखळी मजबूत करण्याची गरज पंतप्रधानांनी विषद केली. त्यानुसार आजच्या ठप्प अर्थव्यवस्थेत मागणी वाढवायची असेल तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार देशातील सर्व कष्टकऱ्यांच्या खात्यात किमान ७,५०० रूपये जमा करण्याचा निर्णय केंद्राने तातडीने जाहीर केला पाहिजे.

हेही वाचा - लाॅकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे पासून, देशाला २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज - पंतप्रधान

त्यावर पलटवार करताना भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारने गोरगरीबांसाठी कोणतं पॅकेज गेल्या ५० दिवसात जाहीर केलं? राहुल गांधी यांचंसुद्धा राज्यातील सरकार ऐकत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला.

काय म्हणाले मोदी?

मोदी यांनी स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत देशवासियांसाठी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. गेल्या काळात दिलेल्या पॅकेजशी हे पॅकेज जोडल्यावर भारताच्या जीडीपीच्या १० टक्के म्हणजेच जवळपास २० लाख कोटी रुपयांचं हे पॅकेजे आहे, असं ते म्हणाले. देशासाठी दिवसरात्र झटणारे शेतकरी, लघू, मध्यम उद्योग, मजुरांसाठी तसंच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी पॅकेज आहे, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. 

भारतासाठी मोठी संधी

एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केलं आहे. जगातील कोट्यवधी लोकं कोरोना संकटाचा सामना करत आहेत. हे संकट कल्पनेपलिकडचं आहे. कोरोना संकटाच्या आधीचं जग आपण पाहिलं आणि नंतरचं जगंही आपल्याला पाहायचं आहे. गेल्या शतकापासून २१ वं शतक भारताचं असल्याचं आपण ऐकत आहोत. २१ वं शतक भारताचं व्हावं, हे आपलं स्वप्न नाही तर जबाबदारीही आहे. जगाची आजची स्थिती पाहता आत्मनिर्भर भारत हाच एकमेव मार्ग आहे, असं मोदी म्हणाले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा