Advertisement

राज्यपालांवर टीका करणं पत्र पंडितांच्या अंगाशी, आशिष शेलारांचा राऊतांना टोला

भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनीही राऊत यांना शालजोडीतले लगावले आहेत.

राज्यपालांवर टीका करणं पत्र पंडितांच्या अंगाशी, आशिष शेलारांचा राऊतांना टोला
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra governor bhagat singh koshyari,) यांनी अद्याप मंजूर केलेली नसताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (shiv sena leader sanjay raut) यांनी कोश्यारी यांच्यावर टीका करून नाहक आफत ओढवून घेतल्याचं म्हटलं जात आहेत. यावरूनच आता भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनीही राऊत यांना शालजोडीतले लगावले आहेत. 

काय म्हणाले शेलार?

भाजप नेते आशिष शेलार (bjp leader ashish shelar) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून राऊत यांना टोला हाणताना म्हटलं आहे की, राज्यपालांवर टीका करणं आता शिवसेनेच्या पत्र पंडितांच्या अंगाशी आलं आहे. कृष्णकुंजमुळे ते मातोश्रीवर पोचले आणि मातोश्रीमुळे संसदेत पोचले. असा ज्यांचा इतिहास आहे, त्यांनी आम्हाला इतिहास विचारू नये.

इतिहास आम्हाला ठाऊक

सध्या अख्ख जग कोरोनाशी (coronavirus) लढत आहे. अशावेळी राऊत हे राज्यपालांवर टीका करीत आहेत. टीका अंगाशी आल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांना राजभवनावर धावाधाव करावी लागली. आता त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. ते आता आम्हाला इतिहास विचारत आहेत, त्यांचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. आम्ही तुम्हाला तुमचा इतिहास विचारू शकतो, असं शेलार यांनी राऊतांना सुनावलं आहे. 

पत्ते पिसत बसावं

राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!,असं ट्वीट करत संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीच्या प्रस्तावावर सही न करता तो तसाच ताटकळत ठेवल्याने ही टीका राऊत यांनी केली होती.

तसंच कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठाम उभं राहायला पाहिजे. ही देशाची लढाई आहे. विरोधी पक्षाला वाटत असेल की असं राजकारण करुन सत्तेच्या पिंडाला कावळा शिवेल, पण आता लॉकडाऊनमध्ये कावळेही नाहीत. अशा अड्ड्यावर बसून जर कोण पत्ते पिसत असेल तर पिसावेत, अशी टीका करत राऊत यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.

यानंतर भाजप नेते राज्यपालांच्या समर्थनार्थ ट्वीट करुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा