Advertisement

शासकीय कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार मिळणार एकाच टप्प्यात

शासकीय कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार दोन टप्प्यात करण्याच्या निर्णयावरून टीका सहन करावी लागलेल्या महाराष्ट्र सरकारने अखेर कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याचा पगार एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार मिळणार एकाच टप्प्यात
SHARES

शासकीय कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार दोन टप्प्यात करण्याच्या निर्णयावरून टीका सहन करावी लागलेल्या महाराष्ट्र सरकारने अखेर कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याचा पगार एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीच्या अनुषंगाने राज्याच्या महसुली जमेवर प्रतिकूल परिणाम झाला असला तरी, शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचं एप्रिल महिन्याचं वेतन एकाच टप्प्यात देण्याचं ठरवलं आहे. 

खर्चात काटकसर

महसुली उत्पन्नात झालेली घट लक्षात घेता खर्चात काटकसर करण्याच्या उद्देशाने सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन मार्च २०२० पासून २ टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने मार्च २०२० च्या वेतनाचा पहिला टप्पा अदा करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. 

कर्मचाऱ्यांवर ताण

एप्रिल महिन्यात मार्च २०२० च्या उर्वरित वेतनाचा दुसरा टप्पा आणि एप्रिल २०२० चा पहिला टप्पा देण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत होता. परंतु प्रत्येक महिन्यात १५-१५ दिवसांची दोन देयके तयार करावी लागल्याने देयके तयार करणारी आस्थापना व कोषागारांच्या कामावरचा ताण वाढला असता. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालये सध्या १० टक्के एवढ्या कर्मचारी क्षमतेवर सुरू आहेत. काही विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक महिन्यात दोन देयके तयार करण्यामुळे वेतन प्रदान करण्यास आणखी विलंब झाला असता. त्यामुळे एप्रिल महिन्याचं वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्चचा दुसरा टप्पा गणेशोत्सवात

मार्च २०२० चं उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील वेतन शक्यतो गणेशोत्सवाच्या वेळी देण्याचं प्रस्तावित असून याबाबत स्वतंत्ररित्या आदेश काढण्यात येतील, असं अर्थ विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा