Advertisement

कोटा शहरात अडलेल्या महाराष्ट्रातील १८०० विद्यार्थ्यांना परत आणणार

राजस्थानच्या कोटा शहरात अडलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी शुक्रवारी फोनवरून चर्चा केली.

कोटा शहरात अडलेल्या महाराष्ट्रातील १८०० विद्यार्थ्यांना परत आणणार
SHARES

राजस्थानच्या कोटा शहरात अडलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी शुक्रवारी फोनवरून चर्चा केली. एवढंच नाही, तर राज्य सरकारकडून राजस्थान सरकारला एक विनंती पत्र देखील पाठवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. 

यासंदर्भात अधिक माहिती देताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, स्पर्धा परीक्षेसाठी गेलेले महाराष्ट्राचे १८०० ते २००० विद्यार्थी लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा इथं अडकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाने त्यांना परत आणण्याची मागणी सरकारकडे केल्याने राज्यातील प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडून कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने राजस्थान सरकारला तसंच केंद्र सरकारला कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सोडण्याची विनंती करणारं पत्र देखील पाठवलं आहे. केंद्र सरकार आणि राजस्थान सरकारकडून परवानगी मिळाल्यावर ३ मे पर्यंत राज्य सरकार या सर्व विद्यार्थांना महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यात आणल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना पुढील १४ दिवसांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने क्वांरटाईन करण्यात येईल, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. 

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांना परत पाठवण्याची विनंती केल्याची माहिती ट्विटर हँडलवरून दिली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी मुख्यमंत्री कार्यालय कार्यरत असून गेलहोत यांचे आभारही मानले आहेत.

काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश आणि हरियाणा सरकारने बस पाठवून आपापल्या राज्यातील विद्यार्थ्यांना परत आणलं आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा