Advertisement

राज ठाकरे बिना मास्कचेच मंत्रालयात… कारण काय?

राज ठाकरे हे मास्क न घालताच मंत्रालयात आल्याने आर्श्चय व्यक्त केलं जात आहे.

राज ठाकरे बिना मास्कचेच मंत्रालयात… कारण काय?
SHARES

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी दुपारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. मंत्रालयामध्ये दुपारी अडीचच्या सुमारास सुरू झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील सहभागी झाले आहेत. परंतु राज ठाकरे हे मास्क न घालताच मंत्रालयात आल्याने आर्श्चय व्यक्त केलं जात आहे. एवढंच नाही, तर मुंबईत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणं महापालिकेने बंधनकारक केलेलं असल्याने राज यांच्याकडून या नियमाचं उल्लंघन झाल्याचंही म्हटलं जात आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १० हजारांच्या पुढं गेला आहे. राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचं सहकार्य महत्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वपक्षीय नेत्यांसोबत संवाद साधत आहेत. यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश आहे.

या नेत्यांचाही समावेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरूवारी दुपारी राज्यातील राज्यातील १८ प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधत आहेत. यामध्ये प्रामुख्याने विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर, जयंत पाटील, इम्तियाज जलील, अशोक ढवळे, कपिल पाटील आदी नेते उपस्थित आहेत.

महापालिकेची सूचना

या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपले चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासोबत दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मंत्रालय परिसरामध्ये पोहोचले. यावेळी अमित ठाकरे यांनी मास्क लावलेला होता. तर राज ठाकरे मास्क न लावताच मंत्रालयामध्ये दाखल झाले. तर इतर सर्व नेते मास्क घालूनच बैठकीला बसले. मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येक व्यक्तीला मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्याला १ हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलं आहे.

कारण काय?

राज ठाकरे स्वत: वारंवार आपल्या कार्यकर्त्यांना कोरोनासंदर्भातील काळजी घेण्याचं आवाहन करत असताना त्यांनीच नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान राज ठाकरे मास्क न घालताच मंत्रालयात का आले, याबद्दल विस्तृत तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही.

 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा