Advertisement

'खड्ड्यांपेक्षा रस्ते, चौक नामकरणाला नगरसेवकांचं प्राधान्य'


'खड्ड्यांपेक्षा रस्ते, चौक नामकरणाला नगरसेवकांचं प्राधान्य'
SHARES

मुंबई शहरातील इतर महत्त्वाचे विषय आणि त्यासंदर्भात प्रश्नाचे गांभीर्य विचारात न घेता नगरसेवकांनी गेल्या 5 वर्षांत केवळ रस्ते आणि चौकाच्या नामकरणाला महत्त्व दिल्याचा अहवाल 'प्रजा फाऊंडेशनने' मंगळवारी दिला आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे मुंबईकर त्रस्त असताना नगरसेवक मात्र रस्त्याचे आणि चौकाच्या नावातील बदलाबाबत प्रश्न विचारत राहिले. 

मार्च 2012 ते डिसेंबर 2016 दरम्यान नगरसेवकांनी विचारलेल्या दर सहा प्रश्नांपैकी साधारण एक प्रश्न रस्ता आणि चौकांना नाव देणे किंवा नावात बदल करण्याविषयी होता. 2017 च्या महापालिका निवडणुकीत मुंबईच्या रस्त्यांविषयी भरभरून बोलणाऱ्या आणि शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांनी खड्डयांबाबत फक्त 18 प्रश्न विचारले. शिवसेनेने फक्त 3 प्रश्न खड्डयांविषयी विचारले. 2012 ते 2016 चा नगरसेवकांच्या प्रश्नांबाबत प्रजा फाऊंडेशनने मंगळवारी अहवाल सादर केला. या अहवालात नगरसेवक मुंबईकरांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत उदासीन असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

227 पैकी 88 नगरसेवकांनी मार्च 2012 ते डिसेंबर 2016 दरम्यान प्रभाग समित्यांमध्ये 5 प्रश्न प्रती वर्षाला विचारले. प्रभाग समितीत 5 वर्षांमध्ये उज्ज्वला मोडक आणि ज्योत्स्ना परमार यांनी एकही प्रश्न विचारला नाही. मुंबईकरांना भेडसावून सोडणाऱ्या साथीच्या आजारातील डेंग्यू आणि मलेरिया या प्रश्नांवर सर्व नगरसेवक उदासीन होते. 2016 च्या अखेरपर्यंत 39 टक्के तक्रारी प्रलंबित होत्या. 2016 मध्ये कार्यक्रम पत्रिका (पत्र) च्या आयुधा अंतर्गत 351 प्रश्नांपैकी 263 प्रश्न हे रस्ते, चौकांना नाव किंवा नावात बदल करण्याविषयीचे होते. सर्व राजकीय पक्ष निवडणूक प्रचार काळात आणि वचननाम्यात रस्ते, आरोग्य या मुद्द्यांवर विशेष भर देताना दिसतात. मात्र निवडणुका झाल्यानंतर त्यांना त्या मुद्यांविषयी फारशी कळकळ नसते. रस्ते आणि खड्ड्यांसंबधीच्या तक्रारींमध्ये 2011 नंतर वाढ झाली असून, त्याचवर्षी मुंबई महानगर पालिकेने 'व्हॉईस ऑफ सिटीझन्स' हे मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केले होते. 2011 ते 2013 पासून तक्रारींमध्ये 1 हजार 538 ते 38 हजार 279 इतकी वाढ झाली. त्यानंतर हे अॅप्लिकेशन बंद करण्यात आले.

जेव्हा नागरिकांना गाऱ्हाणे मांडण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला जातो तेव्हा ते मोठया संख्येने सहभागी होतात. एक उत्साहवर्धक आकडेवारी म्हणजे प्रत्यक्ष 61 टक्के तक्रारींना मुंबई महानगर पालिकेने सेवा पुरवून प्रतिसादही दिला आहे. आपल्या दैनंदिनी आयुष्यावर परिणाम करणाऱ्या मुद्यांविषयी नागरिकांनी सातत्याने महानगर पालिकेकडे पाठपुरावा करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या निताई मेहता यांनी म्हटले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा